Prithvik Pratap Wedding : यंदाच्या वर्षात सिनेसृष्टीत अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकले. यानंतर आता आणखी एक मराठमोळा अभिनेता लग्नबंधनात अडकला असल्याचं समोर आलं आहे. यापूर्वी लग्नाबाबतची कोणतीही पूर्वसूचना न देता थेट लग्नाचे फोटो शेअर करत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने लग्न केल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप विवाहबंधनात अडकला आहे. थेट लग्नाचे फोटो शेअर करत अभिनेत्याने गुडन्यूज दिली. त्याने स्वतः सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केल्याचं सांगितलं आहे.
पृथ्वीकने त्याच्या बायकोबरोबरचे फोटो शेअर करत लग्न केल्याची बातमी दिली. “२५-१०-२०२४. एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने!”, असं खास कॅप्शन देत त्याने लग्नाचे फोटो शेअर केले. लग्नाच्या लूकमधील पृथ्वीक व त्याच्या बायकोचा खास पारंपरिक अंदाज साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. फोटोंवरुन दोघांनी अत्यंत साधेपणाने लग्न केलं असल्याचं दिसतंय. अभिनेत्याची ही पोस्ट पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
आणखी वाचा – शुभमंगल सावधान! लग्नबंधनात अडकला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप, पहिला फोटो समोर
पृथ्वीकच्या या लग्नाच्या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी कमेंट करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्रसाद खांडेकरने “अभिनंदन पृथ्वीक आणि प्राजक्ता”, असं म्हटलं आहे. तर श्रुती मराठेने “आता मी खूप खुश आहे”, असं म्हणत आनंद व्यक्त केला आहे. अक्षया नाईकने “ओह माय गॉड. अभिनंदन. खूप प्रेम”, असं म्हणत आश्चर्य व्यक्त केलं आहे. अमृता खानविलकरने, “अभिनंदन गोड जोडी”, असं म्हटलं आहे.
याशिवाय अभिजीत खांडकेकर, अश्विनी महांगडे, सोनाली पाटील, स्वानंदी टिकेकर, सायली संजीव, केतकी विलास, गौरी नलावडे, ऋतुराज फडके, सारंग साठे, साक्षी गांधी, निखिल राऊत, प्रथमेश शिवलकर, गायत्री दातार, अभिनय बेर्डे, आकांक्षा गाडे, अमित फाळके, अक्षय केळकर, इशा केसकर या कलाकारांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.