लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. तिने वेगवेगळ्या भूमिका साकारत सिनेसृष्टीला स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलं. ‘मन फकिरा’, ‘बेभान’, ‘फतेशिकस्त’, ‘बोगदा’, ‘चंद्रमुखी’, ‘नटसम्राट’, ‘फर्जंद’, ‘मोकळा श्वास’ यासारख्या अनेक चित्रपटामधून ती आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मृण्मयीने अभिनय क्षेत्र तर गाजवलंच आहे पण ती अभिनयाबरोबरच शेती व्यवसायाकडेही वळली आहे. गेल्या काही वर्षांपासून ती शेतीत रमली आहे. मृणयमी तिच्या पतीबरोबर महाबळेश्वर येथे शेती करण्यात व्यग्र आहे. (Mrunmayee Deshpande Mahabaleshwar House)
मृण्मयी २०२० पासून मुंबई सोडून महाबळेश्वर येथे राहत आहे. तिने महाबळेश्वरला छोटंसं टुमदार घरही बांधलं आहे. तिने शेतीपूरक व्यवसायही सुरू केला आहे. ती अनेकदा तिचे तिच्या शेतातले फोटो आणि व्हिडीओही चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच तिने आता तिच्या सोशल मीडियाद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमधून तिने तिच्या घराबाहेर ऊन पडल्याचे दाखवले आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. गेल्या काही दिवसांतील सततच्या पावसाने इथलं वातावरण सतत पावसाळी असतं. अशा ठिकाणी ऊन जास्त पडत नाही. पण अनेक दिवसांनी इथे ऊन पडले असून मृण्मयीने याचा आनंद व्यक्त केला आहे.
आणखी वाचा – घरोघरी मातीच्या चुली! आलिया भट्टने स्वतःच्याच नणंदेला म्हटलं चुगलीखोर, सतत गॉसिप करते आणि…
मृण्मयीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “आजचा महाबळेश्वरचा दिवस खूप खास आहे. कारण जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर अशा चार महिन्यांनी इथे ऊन पडलं आहे. खूप दिवसांनी इथे ऊन पडलं आहे. इथे आता जमीन आहे तिथे आम्ही स्ट्रॉबेरी लावणार आहोत. ऊन पडल्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. आम्ही पटापट कपडे धुवायला घेतले. कारण माहीत नाही आज ऊन आहे तर उद्या असेल की नाही”. दरम्यान या व्हिडीओमध्ये ऊन पडल्यामुळे मृण्मयीच्या पाळीव श्वानांनीही आनंद झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.
मृण्मयीने हा खास व्हिडीओ शेअर करत कॅप्श्नमध्ये स्वरचित कविताही लिहिली आहे. “धरती होती आसुसलेली.. आकाशाची निळी निळाई.. ऊन कोवळे मिलन करता.. बीज तान्हुले जन्मा येई…” अशी खास कविता करत मृण्मयीने तिला आनंद झाल्याचे सांगितले आहे. मृण्मयीने शेअर केलेल्या या व्हिडीओ चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “खूप छान”, “किती तो आनंद”, “ताईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे” अशा अनेक कमेंट्स करत नेटकर्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे