Remo D’Souza Booked for Cheating : कोरिओग्राफर रेमो डिसोझा आणि त्याची पत्नी लीझेल डिसोझा यांच्या विरोधात महाराष्ट्रातील ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डान्स ग्रुपची ११.९६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, या प्रकरणी आणखी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ वर्षीय डान्सरच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, १६ ऑक्टोबर रोजी रेमो, लीझेल आणि इतर पाच जणांविरुद्ध आयपीसी कलम ४६५ (फसवणूक), ४२० (फसवणूक) आणि इतर संबंधित तरतुदींनुसार मीरा रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एफआयआरनुसार, तक्रारदार आणि त्याच्या साथीदारांची २०१८ ते २०२४ या काळात फसवणूक झाल्याचा आरोप आहे. एफआयआरमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, एका टीव्ही शोमध्ये एका डान्स ग्रुपने परफॉर्म केले आणि त्यांनी हा शो जिंकला. तसेच आरोपींनी हा डान्स टोळीचा ताफा दाखवून बक्षीस म्हणून मिळालेल्या ११.९६ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोपही त्यांच्यावर केला आला आहे. अधिकाऱ्याने असेही सांगितले की रेमो व लीझेल व्यतिरिक्त या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये ओमप्रकाश शंकर चौहान, रोहित जाधव, फ्रेम प्रॉडक्शन कंपनी, विनोद राऊत, रमेश गुप्ता आणि एक पोलिस यांचा समावेश आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.
आणखी वाचा – Video : जिनिलीया देशमुखचा नवरा, मित्र-मंडळींसह घरातच भयंकर वेडेपणा, गाणं वाजताच बेभान होऊन नाचले अन्…
रेमो डिसूझा हा केवळ बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर नाही तर त्याने ‘फालतू’, ‘एबीसीडी’ आणि ‘रेस ३’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. याशिवाय तो अनेक डान्स शोमध्ये जज म्हणूनही दिसला आहे. त्याने ‘डान्स इंडिया डान्स’, ‘झलक दिखला जा’, ‘डान्स के सुपरस्टार्स’, ‘डान्स प्लस’ आणि ‘डीआयडी लिटिल मास्टर’ सारख्या शोसाठी जजची भूमिका सांभाळली.
आणखी वाचा – गप्पा सुरु असतानाच ओरीने रणवीर सिंहचा ओढला चष्मा, अभिनेत्याचा चेहऱ्याचा बदलला रंग, केलं असं काही की…
रेमो दिग्दर्शक म्हणून त्याचा आगामी चित्रपट ‘बी हॅप्पी’च्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होईल. या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि इनायत वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात नोरा फतेही व जॉनी लीव्हरसारखे लोकप्रिय चेहरेही झळकणार आहेत.