‘बिग बॉस मराठी ५’ या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली इन्फ्लूएंसर म्हणजे अंकिता वालावलकर. घरात गेल्यापासून अंकिताच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. अंकिताने अनेकदा तिचे लग्न जमल्याची माहिती दिली. पण ती कुणाशी लग्न करतेय याविषयी माहिती तिने दिली नव्हती. अशातच आज अंकिताने बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर केला. अंकिता होणाऱ्या पतीला कोकण हार्टेड बॉय या नावाने हाक मारायची. मात्र तो नेमका कोण आहे, याबाबत तिने सांगितलं नव्हतं. त्यामुळे अंकिताचा होणारा पती कोण आहे? याबाबत चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. अखेर अंकिताने ती ज्याच्याशी लग्न करणार आहे, त्याच्याबद्दल खुलासा केला आहे. (Ankita Walawalkar Future Husband)
याआधी सांगितल्याप्रमाणे अंकिताने आज १२ ऑक्टोबर रोजी आपल्या होणाऱ्या पतीबरोबरचा फोटो शेअर करून त्याचं नाव जाहीर केलं. अंकिताचा होणारा पती कुणाल भगत आहे. तिने इन्स्टाग्रामवर ‘सूर जुळले’ असं कॅप्शन दिलं आहे, त्यामुळे आता हा कुणाल भगत कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कुणाल भगत हा प्रसिद्ध मराठी संगीत दिग्दर्शक आहे. तो गायक व लेखकही आहे. कुणालने अनेक मराठी चित्रपट व मालिकांसाठी संगीत दिग्दर्शनाचं काम केलं आहे. कुणाल करण सावंतबरोबर मिळून काम करतो.
कुणाल-करण या जोडगोळीने ‘पांडू’, ‘अथांग’, ‘नवरदेव’ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘येक नंबर’ यासारख्या चित्रपट आणि मालिकांना संगीत दिलं आहे. झी मराठीवरील “तू चाल पुढं” या मालिकेच्या शीर्षक गीतासाठी कुणाल-करणला अवॉर्डही मिळाला होता. कुणाल हा कोकणातला आहे. अंकिता आणि कुणाल दोघेही एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतात. दोघांनी ‘आनंदवारी’ या गाण्यात एकत्र काम केलं होतं. अंकिताच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. आनंदवारी हे गाणं कसं तयार झालं याचा किस्सा देखील अंकिताने बिग बॉसच्या घरात सांगितला होता.
दरम्यान, कुणाल व अंकिता दोघांच्या अकाउंटवर त्यांचे काही फोटो आहेत. अंकिता व कुणालच्या सोशल मीडिया पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनी दोघांचे अभिनंदन केले आहे. अंकिता व कुणाल फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार आहेत. त्यामुळे आता सर्वजण त्यांच्या लग्नाची वाट पाहात आहेत.