बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि साऊथचा अभिनेता राम चरण यांची खूपच चांगली मैत्री आहे. आलिया व रामचरण यांनी एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटात एकत्र काम केले होते आणि तेव्हापासून त्यांच्यात चांगलेच बंध निर्माण झाले होते. अशातच राम चरणने आलियाची मुलगी राहासाठी अशी गोष्ट केली आहे, जी सर्वांच्याच हृदयाला भिडणारी आहे आणि यामुळे राम चरणाबद्दलचा आदर आणखीनच वाढला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत रामचरणने राहासाठी हत्ती दत्तक घेतल्याचा एक किस्सा अभिनेत्री आलिया भट्टने सांगितला आहे. (Ram Charan Adopted Elephant)
अभिनेत्री आलिया भट्टने ‘सुरेश प्रॉडक्शन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “तारक, मी आणि राम चरण वेगवेगळ्या वेळापत्रकांमुळे ‘आरआरआर’च्या सेटवर जास्त वेळ एकत्र घालवू शकलो नाही. पण प्रमोशनच्या निमित्ताने आम्ही एकमेकांना भेटलो होतो आणि यामुळे आमच्यात चांगलीच मैत्री झाली. या मैत्रीमुळे रामचरण माझ्या मुलीसाठी एक हत्ती पाठवला आणि यामुळे मला आश्चर्य वाटले”.
यापुढे आलिया असं म्हणाली की, “राहा जन्माला आल्यानंतर एक महिना मी फिरायला गेली होती. अचानक कोणीतरी येऊन मला सांगितले की, “मॅडम, राम चरण सरांनी हत्ती पाठवला आहे”. हे ऐकताच मला आश्चर्य वाटले. मला वाटलं काहीही होऊ शकते. माझ्या बिल्डिंगमध्ये सध्या एक महाकाय हत्ती फिरत असावा”. मात्र, हा हत्ती खरा नसून लाकडाचा असल्याचेही यावेळी आलियाने सांगितले.
यापुढे आलियाने सांगितले की, राम चरणने राहाच्या नावाने जंगलात एक हत्ती दत्तक घेतला होता. त्यानंतर घरी एक लाकडी हत्ती पाठवण्यात आला आणि या हत्तीचे नाव त्यानी ‘एली’ ठेवले आहे. आलियाने राहासाठी हा हत्ती डायनिंग टेबलवर ठेवला आहे. आलियाच्या म्हणण्यानुसार राहा या हत्तीच्या पाठीवर बसून खेळते.
दरम्यान, आलियाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आलिया सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जिगरा’ या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. करण जोहरच्या प्रोडक्शनचा हा चित्रपट वासन बाला यांनी दिग्दर्शित केला आहे. आलियाच्या या चित्रपटाला सध्या संमिश्र प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.