Nikki Tamboli First Tweet : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चे हे पर्व विशेष गाजताना पाहायला मिळाले. नुकताच या पर्वाचा महाअंतिम सोहळा अगदी दणक्यात पार पडला. या पर्वाच्या विजेतेपदाचा बहुमान गोलीगत फेम सूरज चव्हाणने पटकावला, तर रनर अप हा अभिजीत सावंत ठरला. टॉप ३ मधील तिसरी स्पर्धक म्हणून निक्की तांबोळीचं नाव समोर आलं. निक्कीने यंदाचं हे पर्व विशेष गाजवलं. यंदाच्या या पर्वात निक्की सर्व स्पर्धकांच्या वरचढ ठरली असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
बाईईईईई हा काय प्रकार असे म्हणत निक्कीने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. हा निक्कीचा पेटंट संपूर्ण महाराष्ट्रात गाजला. तसेच निक्की ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रत्येक स्पर्धकाशी वाद घालताना दिसली. ‘बिग बॉस’च्या घरात असा एकही स्पर्धक नाही ज्याच्याशी निक्कीचा वाद झालेला पाहायला मिळाला नाही. “कन्टेंटची महाराणी, queen of एंटरटेनमेंट” अशा अनेक उपमा ‘बिग बॉस मराठी’मध्ये निक्कीला मिळाल्या.

एलिमिनेट होण्यापूर्वी निक्कीला सुद्धा मनात ती एव्हिक्ट होईल याची खात्री होती. निक्की एलिमिनेट झाल्यानंतर आता तिने ट्विटद्वारे शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. निक्कीने ट्विटद्वारे, “ट्रॉफी उनके पास पर दिल और धमाका हमारे नाम का| क्या लगता है कौन जीता?”, असं म्हणत खूप मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. अर्थात टॉप ३ पर्यंत मजल मारत निक्कीचा ट्रॉफीपर्यंतचा प्रवास हुकला. त्यामुळे निक्की नाराज असल्याचं दिसलं. घराबाहेर आल्यावर निक्कीने पहिली पोस्ट शेअर करत तिच्या लाखो चाहत्यांचे आभार मानले आहेत.निक्कीने पोस्ट शेअर करत, “हा शेवट नाहीये. ही एका नव्या आणि चांगल्या गोष्टीची सुरुवात आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. असंच प्रेम आणि पाठिंबा कायम ठेवा”.

अनेकांचा केलेला अपमान, अनेकदा घातलेले वाद, प्रत्येक गोष्टीवरुन केलेली भांडण या सगळ्यामुळे निक्कीला महाराष्ट्रातून अनेक ट्रोलिंगचा सामना करावा लागला. शिवाय अरबाज बरोबरच्या तिच्या नात्याची विशेष चर्चा रंगली आणि त्यामुळे ही निक्कीला ट्रोल व्हावं लागलं. मात्र, प्रत्येक ‘बिग बॉस’च्या टास्कमध्ये निक्कीने सगळ्यांच्या वरचढ ठरत ठरत प्रेक्षकांची मन जिंकली. निक्कीचाही सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.