Tharala Tar Mag Fame Purna Aaji New Car : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सुरु झाल्यापासून अगदी प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळाली. या मालिकेतून प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सायली व अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. याशिवाय प्रतिमा, प्रिया, कल्पना, पूर्णा आजी, अस्मिता या कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात.या मालिकेत पूर्णा आजीचं पात्र ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी साकारलं आहे. ज्योती यांनी नुकतीच एक आनंदाची बातमी दिली आहे. ज्योती यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी नवी कोरी कार विकत घेतली असल्याचं समोर आलं आहे.
ज्योती चांदेकर यांची लेक अभिनेत्री, निर्माती तेजस्विनी पंडित हिने तिच्या आईने वयाच्या ६८ व्या वर्षी नवीकोरी कार घेतली असल्याची गुडन्यूज सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. आईचं खास कौतुक करत ज्योतीने पोस्ट शेअर करत असं लिहिलं आहे की, “ज्योती चांदेकर. ५२ वर्षाची कारकीर्द. आजतागायत २०० पेक्षा जास्त पुरस्कार नावावर असणारी मोजक्या अभिनेत्रींपैकी एक आणि मग माझी आई. आई यासाठी नंतर कारण काही व्यक्तिमत्त्व ही कामासाठी आधी आणि घरच्यांसाठी नंतर बनलेली असतात”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi मधून एकाचवेळी दोन सदस्य घराबाहेर पडणार?, दोन नावांची रंगली चर्चा, टॉप ५ असणार…

पुढे तिने असं लिहिलं आहे की, “आईने काम सुरु केलं तेव्हा ती १२ वर्षांची होती. मग तिचं लग्न झालं तरी तिने काम करणं सोडलं नाही. मग दोन मुली झाल्या. आम्हाला बरोबर घेऊन पण ती काम करतच होती आणि मग मुली कमवायला लागल्या तरीही ती काम करतच होती. आणि अजूनही ती काम करतेच आहे. थोडक्यात सांगायचं तर या सगळ्या प्रवासात तिची एक तक्रार होती. बसने, ट्रेनने, लोकल गाड्यांनी, आधी बाबाने घेतलेल्या गाडीने आणि मग लेकीने घेऊन दिलेल्या गाडीने खूप फिरले. मग काही काळ धैर्यच्या गाडीने प्रवास केला, आता मला माझी गाडी हवी आहे”.
पुढे तेजस्विनीने असं म्हटलं आहे की, “शेवटी या हट्टी बाईने, माझ्या आईने वय वर्ष ६८ व्या वर्षी तिच्या कमाईची, स्वकष्टाची, स्वतःची गाडी घेतलीच. माझ्या आईची तिच्या कामाप्रती असलेली श्रद्धा व जिद्दीला सलाम. माझ्यासाठी तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघून नकळत ही ठरली आमच्यासाठी ‘येक नंबर मोमेंट’. आई तुला खूप प्रेम”. असं म्हणत तिने आई बरोबरचा नव्या गाडीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे.