Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व कमालीचं गाजलं. अवघ्या काही दिवसांवरच ग्रँड फिनाले येऊन ठेपला आहे. सध्या ‘बिग बॉस’च्या घरात एकूण सात स्पर्धक आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा आता शेवटचा आठवडा सुरु झाला असून येत्या ०६ ऑक्टोबर रोजी ‘बिग बॉस मराठी ५’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आता हा सीझन शेवटच्या टप्प्यात असून काहीच दिवसांत ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा विजेता मिळणार आहे. दरम्यान निक्कीने टास्कमध्ये बाजी पहिलं ‘तिकीट टू फिनाले’ मिळवलं आहे. त्यामुळे आता घरातील इतर स्पर्धकांमध्ये ‘तिकीट टू फिनाले’साठी स्पर्धा सुरु आहे. त्यातच घरात आता मीड वीक नॉमिनेशन देखील होईल. त्यामुळे अगदी कोणत्याही क्षणी कोणत्याही स्पर्धकाचा खेळ संपू शकतो.
या पर्वात निक्की व अभिजीत यांची जोडी चांगलीच गाजली. या जोडीमध्ये कधीकधी भांडण, वाद विवाद झाले असले तरी मित्र म्हणून त्यांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. मध्यंतरी दोघांच्या मैत्रीबद्दल अनेक प्रश्न उठवण्यात आले होते. मात्र यांचा या दोघांवर तसा काहीही फरक पडलेला दिसून आला नाही. अभिजीतच्या बायकोनेदेखील दोघांच्या मैत्रीवर पूर्णपाने विश्वास ठेवत माझा माझ्या नवऱ्यावर दोनशे टक्के विश्वास असल्याचे तिने सांगितले. अशातच आता या दोघांमध्ये चर्चा होताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर दोघांच्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – जयपूरमध्ये तृप्ती डिमरीवर बंदी, चेहऱ्याला काळंही फासलं अन्…; अभिनेत्रीवर नागरीक संतप्त, नेमकं प्रकरण काय?
या व्हिडीओमध्ये निक्की अभिजीतला असं म्हणते की, “जिथे विश्वासूपणा आणि निष्ठा असेल तिथे निक्की तांबोळी असेल. हे वाक्य माझ्यासाठी वापरण्यात आले. का? कारण, मी माझ्या ग्रुपसाठी, घन:श्यामसाठी, जान्हवीसाठी आणि सुरुवातीपासून माझ्याबरोबर जे जे होते त्या सर्वांसाठी मी आधीपासूनच निष्ठावान होते. हेच सगळं मला चक्रव्ह्यूमध्ये दाखवण्यात आले होते. सगळेजण ग्रुप करुन बोलायचे. अंकिता, डीपी हे सगळे एकत्र येऊन बोलायचे की आपण सी ग्रुप काढला पाहिजे म्हणून. पहिल्या दिवसापासूनच तुझ्या आणि माझ्याविरुद्ध सगळं घर एकत्र होतं. फक्त दिखाव्यासाठी ग्रुप होते. आपली नावे मोठी आहेत म्हणून आपला वापर झाला. पण हे आपल्याला समजलं नाही”.
यापुढे अभिजीत तिला असं म्हणतो की, “हेच ‘टीम बी’बद्दलदेखील आहे”. तेव्हा निक्की त्याला असं म्हणते की, “मी टीम बद्दलच बोलत आहे, ‘ए टीम’ तर सुरुवातीपासूनच तशी होती, पण टीम बीबद्दलही ही सारखच होतं”. दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरात सध्या सेलिब्रेशन वीक सुरु आहे. यासाठी आपला माणूस शिव ठाकरे या घरात आला आहे. ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पर्वाचा विजेता कोण होणार याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे