मेगास्टार रजनीकांत यांच्याबद्दलची हेल्थ अपडेट समोर आली आहे. त्यांना सोमवारी रात्री त्यांना चेन्नई येथील आपोलो रुग्णालयात भरती केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री त्यांच्या पोटात खूप दुखू लागले त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करावे लागले. मात्र त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचेदेखील रुग्णालयातील काही सूत्रांनी सांगितले आहे. रजनीकांत यांच्या तब्येतीविषयी माहीत समोर येताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तसेच सगळ्यांनी ते लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थनादेखील केल्या आहेत. अशातच त्यांची पत्नी लता यांनी माध्यमांना त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. (rajinikanth hospitalised)
रजनीकांत यांच्या पत्नीने ‘न्यूज 18’बरोबर संवाद साधला. यावेळी त्यांनी ते बरे असल्याचे सांगितले आहे. त्या याबद्दल अधिक माहिती देऊ शकल्या नाहीत. दरम्यान याआधी दहा वर्षांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सिंगापुर येथे त्याचे किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया केली होती. त्यामुळे तब्येतीमुळे त्यांनी राजकारणामधूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान रजनीकांत यांना रुग्णालयात भरती केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चिंता वाटू लागली आहे. ते लवकर बरे व्हावेत यासाठीदेखील प्रार्थना केली जात आहे. याबद्दलच्या अनेक पोस्टदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
रजनीकांतयांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ते दोन चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत. त्यांचा पहिला चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वेट्टयां’ असे चित्रपटाचे नाव असून यामध्ये त्यांच्याबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतील शहनशाह अमिताभ बच्चनदेखील दिसणार आहेत. 2 ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच होणार आहे. तसेच त्यांचा दुसरा चित्रपट ‘कुली’ पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज करत आहेत.