Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच काही ना काही नवीन घडत असतं. ‘बिग बॉस मराठी’चं पाचवा पर्व हे विशेष धुमाकूळ घालताना दिसलं. यंदाच्या या पर्वात कलाकार मंडळींसह रॅपर, गायक, सोशल मीडिया इनफ्लूएन्सर यांचाही वावर पाहायला मिळाला. ‘बिग बॉस’चा अगदी आता शेवटचा आठवडा सुरु असून स्पर्धक मंडळी धमाल मस्ती करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’चं यंदाच पर्व हे १०० दिवसांच नसून ७० दिवसांच असणार असल्याचं अधिकृतरित्या घोषित करण्यात आलं. त्यामुळे यंदाच्या पर्वाचा आता शेवटचा आठवडा सुरु असल्याचं पाहायला मिळालं. या शेवटच्या आठवड्यात आता एकूण सात सदस्य उरले आहेत.
या सात सदस्यांपैकी नुकत्याच झालेल्या ‘तिकीट टू फिनाले’ मध्ये स्पर्धक म्हणून असलेल्या निक्की तांबोळीने बाजी मारली. निक्की तांबोळी या घराची पहिली ग्रँडफायनॅलिस्ट झाली आहे. तर उर्वरित सहा सदस्य हे नॉमिनेशनच्या प्रक्रियेत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे त्यांच्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार असल्याचे दिसत असतानाच आता या सदस्यांमधील एका सदस्याला मिडविकमध्ये घराबाहेर पडावे लागणार असल्याचे समोर आले. त्यामुळे स्पर्धकांमध्ये आता भीतीच वातावरण असतानाच ‘बिग बॉस’च्या घरात एका माजी विजेता स्पर्धकाची एन्ट्री झालेली पाहायला मिळतेय. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ सीजनचा विजेता शिव ठाकरेने घरात एन्ट्री घेतली असल्याचे पाहायला मिळाली.
घरात एन्ट्री घेताच त्याने सगळ्यांना नमस्कार करत स्पर्धकांच कौतुक केलेलं दिसलं. तर सूरजला त्याने उचलून घेत घट्ट अशी मिठी मारली असल्याचं पाहायला मिळालं. त्याच्या या कृतीनं साऱ्यांचच लक्ष वेधून घेतले. शिव ठाकरे हा सुद्धा अनेक शोमधून आला असला तरी तो आपल्या मातीतला, मराठमोळा असा स्पर्धक होता. त्यामुळे त्याचा साधेपणा हा प्रेक्षकांना विशेष भावला. शिवला ‘बिग बॉस मराठी’मुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
आता पुन्हा एकदा शिव ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांना उत्तेजित करण्यासाठी आला असून तो ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांसह ग्रँड सेलिब्रेशन करणार असल्याचे समोर आले. शिव आल्यानंतर आता स्पर्धकांमध्ये ही उत्साह आल्याचे पाहायला मिळतंय. सदस्यांच्या आजवरच्या प्रवासाचे हटके सेलिब्रेशन शिव ठाकरेबरोबर होणार आहे. शिव घरात येताच तो आधी डोकं ठेवून नमस्कार करतो आणि म्हणतो, “एवढं भव्य दिव्य सेलिब्रेशन होणार आहे जे आजपर्यत ‘बिग बॉस’च्या इतिहासात कधीच झालं नाही. तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्राकडून मानाचा मुजरा आणि सॅल्युट”, असं म्हणत तो घरात एंट्री घेतो.