Dharmaveer 2 Box Office Collection : धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलगडणारा ‘धर्मवीर-२ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट शुक्रवारी (२७ सप्टेंबर) संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट २०२२ साली प्रदर्शित झाला होता. शिवसेनेचे दिवंगत नेते व ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता चित्रपटाच्या सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केलेली पाहायला मिळत आहे.
हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी थिएटरकडे धाव घेतली. अगदी पहिल्या दिवशीच हाऊसफुल्ल थिएटर पाहायला मिळाले. पहिल्याच दिवशी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही चित्रपटगृहांमध्ये गर्दी असलेली पाहायला मिळाली. त्यामुळे पहिल्या दोन दिवसात सिनेमाची चांगली कमाई झाली. यानंतर सलग तिसऱ्या दिवशीही चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्लचा बोर्ड कायम होता. अशातच अवघ्या तीन दिवसांत चित्रपटाने करोडोंच्या घरात कमाई केली असल्याचं पाहायला मिळत आहे.

‘धर्मवीर 2’ प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या दिवशी या चित्रपटाने १.७५ कोटी इतके रुपये कमावले. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटानेने २.३० कोटी रुपये कमावले. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा गल्ला पाहून एकूण या चित्रपटाने किती रुपये कमावले आहेत ते समोर आलं आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शिका स्नेहल तरडे यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, यामध्ये त्यांनी चित्रपटाची तीन दिवसाच्या कमाईची पोस्ट शेअर केलीय.
स्नेहल यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘धर्मवीर २’ या चित्रपटाची तीन दिवसाची एकूण कमाई ७.९२ करोड इतकी असल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघेंच्या मुख्य भूमिकेत असून अभिनेता क्षितीश दातेही एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची भूमिका निभावतो आहे. तो एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत असल्याने त्याचे विविध सीन सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चेदरम्यान सिनेमाची कमाईही लक्ष वेधून घेणारी ठरली.