Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला सुरु होऊन आता जवळपास ५० दिवस पूर्ण झाले आहेत आणि या घरातील खेळ आता आणखीनच रोमांचक होत चालला आहे. आठवा आठवडा सुरु होताच आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्पर्धा दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. आठव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. आठवड्याच्या थीमनुसार घरात पहिल्याच दिवशी ‘शिकाऱ्याची बंदूक’ हे नॉमिनेशन कार्य पार पडलं. ‘बिग बॉस’ने दोन गटांत घरातील सदस्यांची विभागणी केली. एका टीममध्ये निक्की, अरबाज, सूरज, वर्षा आणि जान्हवी हे पाच सदस्य होते. तर, दुसऱ्या टीममध्ये अभिजीत, अंकिता, धनंजय, पॅडी आणि संग्राम हे पाच जण होते. (Bigg Boss Marathi 5 daily updates)
या टास्कमध्ये निक्की व अंकिताची जोडी पाठवण्यात आली. यामध्ये निक्कीने बाजी मारली. दुसऱ्या फेरीत वर्षा व धनंजय या सदस्यांपैकी डीपीने बंदूक मिळवली. यानंतर अरबाज व पॅडीच्या तिसऱ्या फेरीत अरबाजने बाजी मारली आणि बंदूक मिळवली. त्यानंतर जान्हवी व अभिजीत या जोडीत अभिजीतने चपळता दाखवत लगेच बंदूक उचलली. तर, दुसरीकडे पळत येणाऱ्या जान्हवीचा पाय घसरल्याने तिच्या पायाला दुखापत झाली. मग अखेरच्या फेरीत सूरज व संग्राम या जोडीचा सामना रंगला. पण यावेळी संग्रामच्या शक्तीपुढे सूरजची ताकद कमी पडली. त्यामुळे त्याने हा सामना जिंकत आपल्या टीमला इम्युनिटी मिळवून दिली आहे.
या नॉमिनेशनच्या टास्कच्या नियमानुसार कमी पॉईंट्स मिळाल्याने टीम A थेट नॉमिनेट होते. यात निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षा आणि सूरज या पाच सदस्यांचा समावेश होता. हे पांच सदस्य थेट नॉमिनेशन प्रक्रियेत होते. पण शुक्रवारी झालेल्या भागात अरबाज कॅप्टन झाला आहे. त्यामुळे या आठवड्यातील घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेतून अरबाज सुरक्षित झाला आहे. त्यामुळे आता घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत जान्हवी, सूरज, वर्षा व निक्की या चार सदस्यांचा समावेश आहे.
त्यामुळे आता बिग बॉस मराठीच्या घराबाहेर कोण जाणार? याबद्दल अनेक चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सूरजला जनतेचा पूर्ण पाठींबा आहे. याशिवाय जान्हवी व निक्की यांनी प्रत्येक कार्यात पूर्णपणे मेहनत घेत टास्क जिंकले आहेत. त्यामुळे राहिल्या वर्षा उसगांवकर. त्यांनी या आठवड्यात सक्षम कामगिरी केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे आता या आठवड्यात नक्की कोण घराबाहेर जाणार? याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.