मनोरंजन क्षेत्रात आपल्या मूळ नावातच बदल करणे (रवि कपूरचा जितेंद्र झाला), कोणी नावात शाॅर्टफाॅर्मने आडनाव अगोदर लावणे (शांताराम वणकुद्रे यांनी व्ही. शांताराम असे केले), कोणी करियर अपडाऊन होतेय म्हणून काही वर्षांनी आपल्या नावात वडिलांचे नाव लावणे (महेश वामन मांजरेकर) अशा गोष्टी होत असतात. अगदी कोणी टोपणनाव अथवा वेगळ्या नावाने ओळखला जातो (अशोक सराफला मामा म्हणतात) पण एकाद्या अनेक गोष्टीत ‘महागुरु ‘ ठरलेल्याने तसे करावे?(Sachin Pilgoankar Fake Name)
होय खरंच असे घडलयं. तुम्ही यूट्युबवर १९८२ सालचा मनोरमा फिल्म या बॅनरखाली निर्माण झालेला ‘मायबाप ‘ हा चित्रपट आवर्जून पहा. या चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगावकर, संगीता, संजय जोग, प्रिया तेंडुलकर, सुमती जोगळेकर, श्रीकांत मोघे, दया डोंगरे, शलाका, विजू खोटे, दाजी भाटवडेकर, जयराम कुलकर्णी आणि पाहुणी कलाकार कल्पना अय्यर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अतिशय तगडी अशी स्टार कास्ट असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून अभिषेक हे नाव आहे. यूट्युबवर या चित्रपटाची टायटल्स पाहिली तरी तुम्हाला खात्री पटेल. हा दिग्दर्शक अभिषेक म्हणजे कोण माहित्येय? तर सचिन पिळगावकर.

अभिनेता, पटकथाकार, निर्माता, दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक, पार्श्वगायक, देश विदेशातील स्टेज शो, म्युझिकल रिॲलिटी शोचा जज्ज अशा अनेक भूमिकांत अतिशय उत्तम यश संपादलेला असा अस्सल शंभर टक्के फिल्मवाला. बालकलाकार म्हणून तो या क्षेत्रात आला आणि आपल्या अतिशय मेहनतीने, बुध्दीमत्तेने, काळासोबत आपल्यात बदल करत करत तो मोठा झाला. मराठी व हिंदी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीत त्याचा अतिशय उत्तम प्रवास सुरु आहे.पण त्याने चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकताना अभिषेक असे नाव का घेतले.
हे देखील वाचा – अशोक सराफची अशोक सराफशीच स्पर्धा झाली तेव्हा….
मायबाप बघा..(Sachin Pilgoankar Fake Name)
सचिन पिळगावकरच्या भेटीचे आणि मुलाखतीचे योग अधूनमधून अनेक आले. एकदा मी त्याला हा प्रश्न केला. तेव्हा तो म्हणाला, १९६२ सालापासून म्हणजे राजाभाऊ परांजपे दिग्दर्शित ‘हा माझा मार्ग एकला’ पासून मी बालकलाकार म्हणून या क्षेत्रात पाऊल टाकल्यापासून माझ्याकडे सतत काम होतेच. १९७६ पासून मी राजश्री प्राॅडक्सन्सच्या ‘गीत गाता चल’पासून मी नायक साकारतोय. (Sachin Pilgoankar Fake Name)
या प्रवासात मी घरच्या अर्थात वडिलांच्या चित्रपट निर्मितीत मी रस घेत होतोच. ‘चोरावर मोर ‘ या चित्रपट निर्मितीत माझे लक्ष होते. आणि ‘मायबाप ‘मध्ये आपल्याला साजेशी भूमिका आहे असे लक्षात आल्यावर मी दिग्दर्शनाला तयार झालो..पण ‘अभिषेक ‘ हे नाव घेण्यामागे अन्य काही कारणापेक्षा श्रध्देचाच भाग मोठा होता.

हे देखील वाचा – कोठारे-पिळगावकर कुटुंबा बाबत अनोखा योगा योग!वडिलांनी चित्रपट सृष्टीत आणलं आणि पाहिल्याचं चित्रपटात मिळवले पुरस्कार
म्हणून नाव बदललं
आम्ही सारस्वत. गोव्याचे मंगेश हे आमचे कुलदैवत. तेव्हा आपल्या पहिल्या चित्रकृतीला ‘मंगेशी’ला अभिषेक करावा असंच माझ्या आईवडीलांना आणि माझ्या श्रध्दाशील मनाला वाटले म्हणून हे नाव ठेवले, सचिन पिळगावकर म्हणाला आणि तेव्हा मला एका महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.
त्यानंतर सचिन पिळगावकरने ‘सव्वाशेर ‘, ‘नवरी मिळे नवर्याला’पासून चित्रपट दिग्दर्शनात असा काही ‘एकापेक्षा एक’ ‘गंमत जंमत’ मनोरंजन चित्रपटाचा झपाटा लावला की ‘अशी ही बनवाबनवी ‘सारखा सर्वकालीन तरुण आणि धमाल सुपर हिट चित्रपट त्याची सर्वात मोठी झेप ठरली. हिंदीतही प्रेम दीवाने, ‘आजमाईज ‘ वगैरे चित्रपटांचे दिग्दर्शन त्याने केले.
या सगळ्या त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘एकपेक्षा एक’ मनोरंजक चित्रपटांची सुरुवात मात्र ‘अभिषेक ‘ या नावाने केली होती….
दिलीप ठाकूर