Worli Hit And Run Case : काही दिवसांपूर्वी ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणामुळे संपूर्ण मुंबई हादरुन गेली होती. दक्षिण मुंबईतील वरळी परिसरात बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्यामुळे या अपघातात ४५ वर्षीय कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती ५० वर्षीय प्रदीप नाखवा हे गंभीर जखमी झाले. तपासानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीरचा यामध्ये सहभाग असल्याचं समोर आलं. ७ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास वरळीतील अट्रिया मॉलजवळ ही घटना घडली होती. यावेळी नाखवा दाम्पत्य दुचाकीवरुन प्रवास करत होतं. ससून डॉक परिसरातून मासे विकत घेऊन ते दोघंही घरी जात होते. यादरम्यान भरधाव वेगाने आलेल्या बीएमडब्ल्यू गाडीने नाखवा यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातामध्ये प्रदीप नाखवा बचावले. परंतु, त्यांच्या पत्नी कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. (Jaywant Wadkar on Worli Hit and Run Case)
या घटनेत मृत पावलेल्या कावेरी नाखवा या मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या सख्ख्या पुतणी होत्या. सख्ख्या पुतणीच्या अपघाती निधनाने जयवंत वाडकर यांना अतीव दु:ख झाले होते. या घटनेनंतर जयवंत वाडकरांनी आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली होती. अशातच जयवंत वाडकरांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’वर हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं. तसंच या मुलाखतीत जयवंत वाडकरांनी आरोपीच्या कुटुंबियांकडून त्यांच्या पुतणीच्या घरच्यांना मॅनेज केलं गेलं असल्याचाही खुलासा केला.
याबद्दल जयवंत वाडकरांनी असं म्हटलं की, “अपघात होताच मला माझ्या काही वकील मित्रांनी फोन करून धीर दिला होता. तसंच यात त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे असा विश्वासही त्यांनी मला दिला. माझ्या पुतणीचं बारावं झाल्यानंतर माझ्या वकील मित्राने पुतणीच्या नवऱ्याला भेटायला बोलावलं होतं. त्यावेळी मी नाटकाच्या दौऱ्यानिमित्त पुण्याला जात होतो. तेव्हा मी पुतणीच्या नवऱ्याला माझ्या मित्राला जाऊन भेट असं सांगितलं. यावर पुतणीच्या नवऱ्याने मला “मी फोन केल्याशिवाय तू काहीही करु नकोस” असं सांगितलं. पुण्यात गेल्यानंतर मी पुन्हा त्याला फोन लावला तर मला त्याच्याकडून तेच उत्तर मिळालं”.
यापुढे त्यांनी असं सांगितलं की, “यामुळे मी संपलो. माझा मूलगा माझ्याबरोबर होता. तेव्हा मी ढसाढसा रडलो. यामुळे मला असं वाटलं की, इतकी मेहनत करुन मग काय झालं? मला माहीत नाही नेमकं काय झालं? पण मी त्याच्या फोनची वाट बघत आहे. कारण त्याच्या सहीशिवाय काहीही होऊ शकत नाही. लोक आपल्याकडे मॅनेज होतात. त्यामुळे खूप वाईट वाटतं. पण तरी माझा चार सिंहांवर (न्यायव्यवस्थेवर) विश्वास आहे. त्यांना कधीना कधी हे भोगावं लागणार आहे. त्यांनी जे काही केलं आहे, त्याची किंमत त्यांना इथेच भोगावी लागणार आहे. याममुळे मी हतबल झालो”