प्रत्येक कलाकृती साकारण्यासाठी कलाकार दिवस-रात्र मेहनत करत असतात. आपल्या कामातून प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं हा त्यामागचा एकच उद्देश असतो. त्याबदल्यात आपल्या हाती आलेल्या कामाचा मोबदला आपल्याला मिळाला पाहिजे इतकी साधी अपेक्षा कलाकारांची असते. पण कित्येकदा इंडस्ट्रीमध्ये कलाकारांकडून मानधनाच्याबाबतीत वेगळाच सूर कानी येतो. निर्मात्यांकडून पैसे मिळत नसल्याचं कलाकार स्वतःहून सांगतात. आज बऱ्याच कलाकारांचे पैसे अजूनही मिळाले नाहीत अशी कित्येक प्रकरणं आहेत. आता असंच काहीसं अभिनेता आशय कुलकर्णीच्या बाबतीत घडलं आहे. त्याने मालिकेचं नाव न घेता आपलं मत सोशल मीडियाद्वारे मांडलं आहे. हे प्रकरण नेमकं काय हे सविस्तर स्वरुपात जाणून घेऊया.
आशय सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुख कळले’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आशयने याआधी मराठी चित्रपटांसह मराठी मालिकांमध्येही उत्तम भूमिका साकारल्या. पण एका मराठी मालिकेत केलेल्या कामाचे पैसे त्याला अजूनही मिळाले नसल्याचं त्याने त्याच्या पोस्टमधून म्हटलं आहे. आशयने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ही पोस्ट शेअर केली आहे. मात्र ही पोस्ट लिहित असताना त्याने मालिकेचं नाव घेणं टाळलं आहे. या पोस्टद्वारे त्याने निर्मात्यांना पैसे मिळण्याबाबत प्रश्न विचारले आहेत.

आशयने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “मध्यंतरी मी एका मालिकेत काम केलं. मालिकेने नुकताच ८०० भागांचा टप्पा पार केला. त्या शोचे प्रोडक्शन मॅनेजर, अकाऊंट डिपार्टमेंट, ईपी यांना वारंवार फोन, ईमेल केले. तरीही पैसे काही मिळाले नाही. आमच्याकडून रोज शूटला वेळेत येण्याची अपेक्षा असते, पण मग वेळेत पैसे देता का येत नाही?”. दरम्यान, नुकतंच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेने आठशे भागांचा टप्पा पार केला. शिवाय आशयही या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत होता. त्यामुळे आशयने उल्लेख केलेली मालिका हीच असल्याची चर्चा होत आहे. मात्र सोशल मीडियावर या मालिकेबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, आशय सध्या सुख कळले मालिकेत काम करत आहे. आशय हा काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटात झळकला होता. तसेच त्याने झी मराठीवरील ‘पाहिले न मी तुला’, ‘माझा होशील ना’ या मालिकेतही काम केलं आहे. त्याप्रमाणे आशय हा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. अशातच त्याच्या या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.