Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस’ मराठी सीझन ५ मध्ये एकामागोमाग एक रंजक वळण येत आहेत. पहिल्या आठवड्यात स्पर्धकांच्या चुकांवर रितेश देशमुखने चांगलीच शाळा घेतली. तर आता दुसऱ्या आठवड्यातही भाऊच्या धक्क्यावर रितेश चुकलेल्यांची शाळा घेताना दिसला. ‘बिग बॉस’च घर म्हटलं की वाद हे आलेच. प्रत्येक स्पर्धक स्वतःला सिद्ध करण्यासाठी उत्तम खेळ खेळताना दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वातील स्पर्धक योगिता चव्हाणही देखील उत्तम खेळ खेळत असून तिचं खुद्द रितेश देशमुख यांनी कौतुक केलं. मात्र योगिताने भाऊच्या धक्क्यावर केलेलं भाष्य खूप धक्कादायक होतं. उत्तम खेळ खेळणाऱ्या योगिताने हा शो सोडण्याबाबत भाष्य केलं.
भाऊच्या धक्क्यावर रितेश योगिताला म्हणतो, “योगिता तुम्ही छान खेळताय. फक्त टास्कमध्ये गेम दाखवू नका तर इतर वेळीही दाखवा. लक्ष द्या आणि अजून छान खेळा”. रितेश एकूणच ‘बिग बॉस’च्या घरातील योगिताच्या उत्तम खेळाचं कौतुक करतो. त्यावेळी हात वर करत मला काही बोलायचं आहे असं खुणावते. यावर रितेश योगिताला बोलायची संधी देतो. त्यावेळी योगिता म्हणते, “सर मला काही गोष्टींचा खूप मानसिक त्रास होत आहे. आणि मला माहित नाही हे बोलणं कितपत योग्य आहे. पण मला खरंच बाहेर यायचं आहे”.
पुढे योगिता म्हणाली, “मी संपूर्ण टीमची माफी मागते. इथे खूप लोक बोलतात की तू यायलाच नाही पाहिजे होतं. आणि त्यांचं बोलणं अगदी बरोबर आहे. कदाचित माझा निर्णय चुकला असेल. मी माफी मागते. पण खरंच मला इथे खूप त्रास होत आहे”, असं सांगत ती ढसाढसा रडू लागते. यावर रितेश म्हणतो, “कोणी बाहेर यायचं हे खरंतर माझ्या हातात नाही आहे. ते प्रेक्षकांच्या हातात आहे. मी एवढंच सांगेन की, चढ-उतार, भावुक होणं हे प्रत्येक गेममध्ये होत आणि खासकरुन ‘बिग बॉस’मध्ये जास्त होत असतील. पण आतापर्यंत आम्हाला असं कधीच वाटलं नाही की, योगिता गेम सोडायचा विचार पण करत असेल. कारण ती इमेज तुमची आहे”.
पुढे रितेश असंही म्हणाला, “आता तुम्ही असं सांगताय तेव्हा वाटलं की योगिता असा का विचार करत आहेत. त्या छान खेळत आहेत. तुम्ही सांगायच्या आधीच मी तुम्हाला हे म्हणालो की तुम्ही छान खेळत आहात. तुमच्यात क्षमता आहे तुम्ही संधी सोडू नका. थोडा वेळ जाऊद्या. विचार करा. इतरांबरोबर बोला. आणि तुम्ही खूप स्ट्रॉंग महिला आहात. खूप शुभेच्छा”, असं म्हणत तिला खेळायला उत्तेजन दिलं. आता ‘बिग बॉस’च्या घरात योगिता कसा खेळ खेळणार, हे पाहणं रंजक ठरेल.