Vijay Kadam passed away : मराठी अभिनेते विजय कदम हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या सर्वच भूमिकांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. ‘रथचक्र’, ‘टुरटुर’ अशा अनेक नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ८० च्या दशकात त्यांनी अनेक विनोदी भूमिका सकारल्या. मात्र गेल्या काही काळापासून ते अभिनय क्षेत्रापासून लांब असलेले पाहायला मिळाले. आजारपणामुळे ते अभिनयापासून लांब होते. काही काळापूर्वी त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाल्याचे समजले होते. मराठी कलाविश्वातून सर्वांना धक्का देणारी एक बातमी समोर आली. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले आहे.
विजय कदम यांना कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांनी या रोगाचा सामाना अत्यंत कणखरपणे केला. या सर्व प्रवासात त्यांना त्यांच्या कुटुंबाची लाखमोलाची साथ मिळाली. त्यांचा आजारपणातील संघर्ष हा खूप प्रेरणादायी होता. याबद्दल त्यांनी काही महिन्यांपूर्वी याबद्दल ‘इट्समज्जा’शी बोलताना सांगितले होते. त्यांनी म्हंटलं होतं की, “याचे सगळे श्रेय माझी पत्नी व माझा मुलगा गंधार यांना देतो . या प्रवासात या दोघांची ही खूप साथ मिळाली. हे दोघे माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले. तसंच हे एक वाईट स्वप्न समजून मी यातून लवकर बाहेर पडलो. शक्यतो यातून लवकर बाहेर पडत नाहीत. पण मी पडलो आणि नशिबाने चांगले डॉक्टर मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व माझ्या पत्नीच्या साथीमुळे मी यावर यशस्वी मात करु शकलो असं मला वाटतं”.
त्याचप्रमाणे यावेळी त्यांच्या पत्नीनेदेखील भाष्य केले. त्या म्हणाल्या की, “या सगळ्यामध्ये देवाने आमची खूप साथ दिली. विजय कदम यांना झालेल्या आजारपणात आम्हीच जर मानसिकदृष्ट्या खचलो असतो तर तेही खचले असते. त्यामुळे मी व गंधार त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिलो. विजय हे सर्वांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी मी इंडस्ट्रीत जास्त कोणाला सांगितले नाही. जर त्याच्या आजारपणाची बातमी कळली असती तर सर्वांचे फोन कॉल्स घेण्यातच माझा दिवस गेला असता. त्यामुळे मी कुणालाच काही सांगितलं नाही”. वियज कदम यांचा हा संघर्षमयी प्रवास हा खूपच प्रेरणादायी होता. मात्र आज पहाटे त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. त्यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. एक सदाबहार व खळखळून हसवणारा अभिनेता नसल्याने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
त्यांनी आजवर अनेक नाटक व चित्रपटांमध्ये काम केले असून ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘टुरटूर’ ही नाटकं विशेषतः खूप गाजली. त्याचप्रमाणे ‘चष्मेबहाद्दर’, ‘पोलिसलाइन’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ व ‘आम्ही दोघं राजा राणी’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका सकारल्या आहेत.