स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ‘पुढचं पाऊल’ मालिकेद्वारे तिने मनोरंजन क्षेत्रात तिचं पहिलं पाऊल टाकलं. यानंतर अभिनेत्रीची या क्षेत्रातील घोडदौडही अजूनही चालूच आहे. जुई ही गेली अनेक वर्ष टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असली तरी तिने खडतर प्रवास करत आताचे स्थान प्राप्त केलं आहे. २०१३ सालापासून तिला काही शारीरिक समस्यांना, आजारांना सामोरं जावं लागलं. काही वर्षांपूर्वी जुई गडकरी मोठ्या आजाराशी झुंज देत होती. त्यामुळे तिने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. जवळपास ५ ते ६ वर्षे जुई इंडस्ट्रीपासून लांब होती.
याच काळात तिला अनेक औषधं अन् गोळ्या खाव्या लागायच्या. या आजारामुळे जुई दिवसात एकाच वेळी १८-१८ गोळ्या खात असे. मात्र कालांतराने तिला या सर्वांचा कंटाळा येऊन तिने या सर्व औषधांचा त्याग केला. तिने सर्व औषध-गोळ्या खाणे सोडून दिले आणि पूर्णपणे सकारात्मकता आणली. याच सकारात्मकतेमुळे तिने तिच्या आजारावर मात दिली असल्याचेही तिने म्हटले. या सगळ्यात जुईला दत्तगुरुंची साथ लाभली. त्यांच्यावरील श्रद्धेमुळेच तिने या गंभीर आजारवर मात दिली. याचबद्दल ‘जुईने दिलके करीब’ या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
याबद्दल बोलताना जुई असं म्हणाली की, “मी आध्यात्मिक गोष्टी खूप केल्या. ज्या मी आजही करते. गुरुमहात्म्यचं मी रोज न चुकता वाचन करते आणि ज्या दिवसापासून हे वाचन सुरु केलं, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून माझा त्रास कमी झाला आहे. यांच्या घरात दत्तगुरुंचे पूजा-पाठ केले जातात. त्यामुळे मी गुरुमहात्म्यचं रोज पूर्ण निष्ठेने वाचते. मी आजही माझं आजारपण दत्तगुरुंच्या पायावर सोडलेलं आहे. माझे जे काही होईल ते दत्तगुरु बघून घेतील या विचाराने मी त्यांना समर्पित आहे आणि त्यांनी ते केलंही आहे. दत्तगरुंनी मला माझ्या आजारपणातून पूर्णत: उभं केलं आहे”.
यापुढे ती असं म्हणाली की, “माझ्या आयुष्यात एक अशीही वेळ आली होती जिथे मी माझ्या गाडीतला गणपती फेकून दिला होता. इतकी मी देवावर चिडली होती. पण तो प्रसंग आणि आता मी जिथे आहे ते हा प्रवास खूप भारी होता. मला आता माझा मार्ग मिळाला आहे. मी फार आध्यात्मिक नाही. पण मी रोज न चुकता देवाची पूजा आणि वाचन करते. त्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही”. दरम्यान, जुई ही सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून या मालिकेला व तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तिची भूमिका व मालिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.