‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रम मराठी कार्यक्रम असल्याने यांत मराठी कलाकारांना प्राधान्य दिलं पाहिजे या मताचे अनेकजण आहेत. दरम्यान, यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’ या नव्या पर्वात इरिना रूडाकोवा या परदेसी गर्लची एण्ट्री अनेकांना खटकलेली आहे. या परदेसी पाहुणीने ‘बिग बॉस मराठी ५’ च्या रंगमंचावर एण्ट्री करत अफलातून परफॉर्मन्ससुद्धा केला. घरातही इरिना सगळ्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करताना दिसली. विशेष बाब म्हणजे तिने मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत प्रेक्षकांची मनं जिंकली. (Bigg Boss Marathi 5 Updates)
इरिना ही मूळची मराठी नसल्याने तिच्यासाठी हा खूप मोठा टास्क आहे. या रिऍलिटी टीव्ही शोमध्ये पदार्पण करत इरिना, बिग बॉसच्या कसोटीचा सामना कशाप्रकारे करेल याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अनेकजण इरिनाला सपोर्ट करताना दिसत आहेत. तर काहींना इरिनाची एण्ट्री खटकली आहे. खुद्द ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकालाचं इरिना या शोसाठी पात्र नाही असं वाटत आहे. याचा खुलासाही ‘बिग बॉस’च्या घरात झाला.
इरिना ऐवजी ‘बिग बॉस’च्या घरात आणखी कोणा एका मराठी कलाकाराला घ्यायला हवं होतं असं कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिचं म्हणणं आहे. याबाबत ती बोलताना असं म्हणाली की, “पहिलाच दिवस आहे त्यामुळे काही बोलायला नको. सगळेच इंग्रजी भाषेमधून तिच्याशी संवाद साधत आहेत. मराठी शिकवण्यासाठी तिला इथे पाठवलं असेल. तिला आम्ही मराठी शिकवावं असा उद्देश असणार. मला भाषेविषयी अडचण नाही. सगळ्यांना सगळ्या भाषा आल्याच पाहिजे. पण जेव्हा आपण मराठी शो म्हणतो तेव्हा एका मराठी कलाकाराची जागा गेली असं मला वाटतं”.
इरिनाही मॉडेल व अभिनेत्री आहे. इरिनाला सोशल मीडियावरुन प्रसिद्धी मिळाली. त्याचबरोबर नुकतीच ती एका मराठी रॅप सॉंगमध्ये झळकली होती. त्यानंतर ती मराठी इंडस्ट्रीतही लोकप्रिय झाली. इरिनाचं ‘इरा राय’ या नावाने सोशल मीडियावर अकाउंट असून तिचे दीड लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. ‘छोटी सरदारनी’ या हिंदी मालिकेतूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.