बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमी चर्चेत असतो. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे जगभरात अनेक चाहते आहेत. शाहरुखच्या चित्रपटांनी आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. मात्र आता तो कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर त्याच्या तब्येतीमुळे चर्चेत आला आहे. शाहरुखला डोळ्यांचा त्रास होत आहे त्यामुळे त्याच्यावर आता उपचार सुरु आहेत. या उपचारांसाठी तो परदेशात जाणार अशीही चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी तो लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना करत आहेत. (shahrukh khan health update)
‘बॉलिवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, शाहरुख डोळ्यांवर उपचार करत आहे. यासाठी तो मुंबईतील एका रुग्णालयात दाखल झाला. मात्र त्यावर हवे तसे उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे आता त्याने युएसएला जाऊन उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तो 30 जुलै रोजी परदेशात जाऊन उपचार सुरु करु शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. समोर आलेल्या रिपोर्टमध्ये लिहिले आहे की, “शाहरुख खान २९ जुलै रोजी उपचार घेण्यासाठी मुंबईमधील एका रुग्णालयात गेला होता. मात्र तिथे योग्य उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे तो अमेरिकेला जाणार आहे”.
शाहरुख हा IPL टीम कलकत्ता नाइट रायडर्सचा मालक आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मॅचच्यादरम्यान दिसून आला होता. अंतिम सामना होण्यापूर्वीच त्याची तब्येत खराब झाली होती व त्याला केडी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यावेळी त्याला डिहायड्रेशनचा त्रास झाला होता. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले होते. याबद्दलची अपडेट जुही चावलाने चाहत्यांबरोबर शेअर केली होती.
शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, २०२३ साली तो ‘पठाण’, ‘जवान’ व ‘डंकी’ या चित्रपटांमध्ये दिसून आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आता तो सुहाना खानबरोबर सुजॉय घोषच्या ‘किंग’ या चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. यामध्ये अभिनेता अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.