अभिनेत्री हिना खान सध्या खूप कठीण परिस्थितीतून जात आहे. अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही काळापूर्वी तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती मिळाली होती. सध्या अभिनेत्रीवर उपचार सुरु आहेत. हिनाला तिसऱ्या स्टेजचा स्तनाचा कर्करोग आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने कोणीही घाबरुन जाईल आणि हिनाही पूर्णपणे घाबरली असावी, पण तिने केवळ धैर्य राखले नाही तर लोकांना प्रेरणा आणि जागरुक करण्याचे ठरवले. पण आता तिला खूप वेदना होत असल्याचं दिसत आहे. (Hina Khan On Terrible Pain)
हिना खानने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिला भयंकर वेदना होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अल्लाहचे स्मरण करत तिने लिहिले आहे की, “अल्लाहशिवाय कोणीही तुमचे दुःख दूर करु शकत नाही. प्लिज अल्लाह, प्लिज”. याबरोबर तिने एक भावनिक इमोजीही शेअर केला आहे. हिना खानने अलीकडेच तिला कॅन्सर झाल्याचे कसे कळले याबाबत सांगितले. अभिनेत्रीच्या आजारपणाबाबत कळताच सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी तिला पाठिंबा दिला.

३६ वर्षीय हिनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला होता आणि सांगितले होते की, ती अनेकदा आजारी पडू लागली होती आणि तिला वारंवार ताप येत होता. डॉक्टरांकडे गेल्यावर तिला कॅन्सरची तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला. हे ऐकून हिनाच्या पायाखालची जमीनच सरकली. पण यावेळी तिने कसेतरी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि आता अभिनेत्रीवर केमोथेरपी सुरु झाली. या मोठ्या आजाराशी लढण्याची ताकद हिनाला मिळो यासाठी तिचे चाहतेही प्रार्थना करताना दिसत आहेत.
हिनाने किमोथेरपी घेण्यापूर्वी तिचे केसही कापले. तिची अवस्था पाहून आईलाही अश्रू अनावर झाले आणि आपल्या मुलीसाठी तिनेदेखील प्रार्थना केली. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही शोमधून अक्षराच्या भूमिकेतून हिना खान घराघरात प्रसिद्ध झाली. याशिवाय तिने अनेक वेबसीरिज व म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले आहे.