झी मराठी वाहिनीवर नुकताच ‘ड्रामा ज्युनिअर्स’ हा नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या कार्यक्रमात कवी व अभिनेता संकर्षण कर्हाडे परिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. या कार्यक्रमात त्याच्याबरोबर अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील परीक्षकाच्या भूमिकेत आहे. मात्र या कार्यक्रमाच्या परीक्षणासाठी संकर्षणने आधी नकार दिला होता. काही दिवसांपूर्वीच याबद्दलची एक पोस्ट संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने ड्रामा ज्युनिअर्सच्या परीक्षकाच्या भूमिकेसाठी नकार का दिला होता याबद्दल सांगितले होते.
या पोस्टमध्ये संकर्षणने “खरं सांगू का, मी साफ नकोच म्हणलं होतं. वाटलं की, मी का आणि काय कुणाचं परिक्षण करणार? पण झी मराठीने फार विश्वासाने ही जबाबदारी दिली आहे. २००८ साली स्पर्धक म्हणून झी मराठीनेच संधी दिली होती आणि आता त्यांनीच परिक्षकाचा मान दिला आहे. विश्वास ठेवा, मी हेही काम अत्यंत प्रामाणिकपणे करेन” असं म्हटलं होतं. यावर आता पुन्हा एकदा संकर्षणने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संकर्षणने नुकताच ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. यामध्ये त्याने त्याच्या परिक्षकाच्या भूमिकेच्या होकाराबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा – “तुझ्याशिवाय हा विजय…”, विराट कोहलीची पत्नीसाठी कौतुकास्पद पोस्ट, म्हणाला, “हे यश…”
यावेळी संकर्षणने असं म्हटलं की, “मला जेव्हा कॉल आला तेव्हा मला वाटलं की निवदेन करायचं आहे की काय? मग ते बोलले नाही. मग मला वाटलं ते लिखाणासाठी विचारत आहेत. पण मग ते म्हणाले की, निवेदनही नाही आणि लिखाणही नाही, तुला यावेळेस परीक्षक व्हायचं आहे. तर मला ते नको होतं. आपल्याला एक खुर्ची, आपण कुणाला तरी चूक-बरोबर सांगणार याचं मला दडपण होतं”.
आणखी वाचा – Video : आजोबांना टीव्हीवर बघून नातू खुश, अरुण कदमांच्या पत्नीने शेअर केला नातवाचा गोड व्हिडीओ
यापुढे त्याने असं म्हटलं की, “माझंच काम आता चालू आहे. त्यामुळे मला ही जबाबदारी नको असं म्हणलं होतं. पण मग ते म्हणाले ३ ते ११ हा जो वयोगट आहे, त्यांना एक दादा म्हणून, घरातील आपली माणसं ज्यापद्धतीने समजवतात, हे छान आहे हे अजून छान होऊ शकतं. आहे ते अजून किती छान होऊ शकतं. तसंच तुला दादा म्हणून सांगायचं आहे. मग मला ही भूमिका पटली आणि मग मी इथे यायला हो म्हणालो”.