मुंबई, पुणे महानगरपालिकेकडून सध्या अनधिकृत पब्स आणि बारवर कारवाई करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचं सत्र जोरदार सुरु आहे. पुणे येथील पोर्श प्रकरणानंतर या हालचाली सुरु झाली असल्याचं समोर आलं आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात सुरु असलेल्या अमली पदार्थांच्या विक्रीच्या घटना समोर येत आहेत. यासंदर्भात एका मराठमोळ्या अभिनेत्याने एक चपखल अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. हा अभिनेता म्हणजे सौरभ गोखले. (Saurabh Gokhale Post)
सौरभने त्याच्या सोशल मीडियावर अकाउंटवरुन केलेली एक मार्मिक पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. पुण्यातील अनधिकृत कारवाईवर अभिनेत्याने सडेतोड भाष्य केलं आहे. सध्या महानगरपालिका या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात व्यस्त आहेत. अशातच सौरभने हा मुद्दा उचलून धरला आहे. सौरभ नेहमीच न पटणाऱ्या मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य करताना दिसतो. पुण्यात मागील काही दिवसांपासून तरुण ड्रग्जचे सेवन करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावर वाचा फोडणारी अशी पोस्ट शेअर करत सौरभने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

सौरभने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “शहरातील अनेक ई-लीगल पब्स आणि बार्सवर महापालिकेची कारवाई! पण हे अनधिकृत बार व पब बांधू देऊन इतकी वर्ष ज्यांनी मोकाट चालू दिले त्या जादूगारांचा कौतुक सोहळा कधी?, असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. अभिनेत्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आलेली पाहायला मिळाली. आशयघन आणि आजूबाजूला घडणाऱ्या या विषयात थेट हात घालत सौरभने केलेलं भाष्य योग्य आहे.
अनेक मालिका, चित्रपट व नाटक यांमधून सौरभने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ‘राधा ही बावरी’ ही सौरभची मालिका विशेष गाजली. ‘मी नथुराम गोडसे’ या नाटकातून सध्या सौरभ रंगभूमी गाजवत आहे. या नाटकात त्याने मुख्य पात्र म्हणजेच नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे.