मराठी चित्रपट, मालिका यांमध्ये विनोदी व्यक्तिरेखा साकारत अभिनेता पुष्कर श्रोत्रीने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आजवर त्याने विविध विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. त्याने साकारलेल्या विनोदी भूमिकांनी सिनेरसिकांना खळखळून हसवलं. नेहमीच व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढत तो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संपर्क साधतो. विविध व्हिडीओ व फोटोही तो शेअर करताना दिसतो. तसेच अनेक न पटणाऱ्या मुद्द्यांवरही तो परखडपणे भाष्य करताना दिसतो. अभिनयाबरोबर पुष्कर उत्तम सूत्रसंचालक म्हणून लोकप्रिय आहे. (Pushkar Shrotri On Awards)
पुष्करने आजवर अनेक नामांकित अवॉर्ड शोच्या सूत्रसंचालकाची जबाबदारी पेलवली आहे. अशातच अभिनेत्याने अवॉर्ड शोवरुन एका मुलाखतीत केलेलं भाष्य साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. नुकतीच पुष्करने ‘कॉकटेल स्टुडिओ’ला मुलाखत दिली. यावेळी पुष्करला “एकूण ३२ वर्षांचं करिअर आणि तुरळक अवॉर्ड्स हा तुझ्यातल्या कलाकारावर झालेला अन्याय आहे असं वाटतं का?”, असा प्रश्न विचारला. यावेळी अवॉर्ड्स बाबत पुष्करचं असलेलं मत त्याने स्पष्टपणे मांडलं आहे.
मुलाखतीदरम्यान विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत पुष्कर म्हणाला, “अन्याय आहे म्हणता येईल पण तो अन्याय मीच स्वतःवर केला आहे. मी स्वतःला लोकांसमोर योग्य पद्धतीने पोर्ट्रे केलं नाही. ‘रेगे’मधल्या भूमिकेसाठी मला सहाय्यक अभिनेत्याचा अवॉर्ड मिळाला. राष्ट्रीय पुरस्कारही मिळेल असं वाटत होतं पण तो मिळाला नाही. ‘सिटीझन’ सिनेमात एकच सीन केला होता त्यासाठी मला अवॉर्ड मिळालं. पण अशी काही तुरळक मोजकी अवॉर्ड्स वगळता मला अनेक नॉमिनेशन मिळाले पण असे फार अवॉर्ड्स मिळाले नाहीत. अवॉर्ड शोमध्ये होस्ट करत असताना मी इतरांसाठी अवॉर्ड घोषित केले पण मलाच अजून अवॉर्ड मिळाले नाही”.
आणखी वाचा – मालिकाविश्वातील ‘या’ सहाय्यक दिग्दर्शकाने अपघातात गमावला जीव, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
पुढे तो म्हणाला, “मला वाटतं की मीच स्वतःला योग्य पद्धतीने समोर ठेवलं नसेल तर मला कसे अवॉर्ड मिळणार. ‘रेगे’ सारखी भूमिका केल्यानंतर लोकांना परत असं वाटलं पाहिजे ना की, याला अशा प्रकारच्या भूमिका ऑफर केल्या पाहिजेत. पण मला परत अशा भूमिका आल्याच नाहीत. ते मिळवण्यासाठी मीही स्वतःमध्ये काही बदल केले नाहीत. माझ्याकडे विनोदी भूमिका या येत गेल्या आणि त्यामुळे मीच त्याच करत गेलो. विनोदी भूमिका करणं चूक आणि गंभीर भूमिका करणं योग्य असं माझं बिलकुल मत नाही”. पुष्कर पुढे असंही म्हणाला, “अभिनेत्याने सर्वप्रकारच्या भूमिका केल्या पाहिजेत. पण दुर्दैवाने माझ्या वाट्याला अशा फार मोजक्या भूमिका आल्या ज्यात माझ्या अभिनयाचा कस लागला. पुरस्कार वाट्याला आले नाहीत. पण म्हणून काही तिरस्कारही आले नाहीत. जे केलं त्यात आनंद वाटला. पण माझ्यातला अभिनेता जागा होईल अशी कोणतीतरी भूमिका मला मिळावी असं मला वाटतं. पण अशा भूमिका मिळवण्याची कला माझ्यात नाही आहे”.