‘बिग बॉस मराठी’ या शोमध्ये झळकलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवने इन्स्टाग्रामवर ईदनिमित्त काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने ‘ईद मुबारक’ म्हणत एका ट्रॅव्हल शोसाठी बहरीनमध्ये शूटिंग करताना खूप छान अनुभव आल्याच्या भावना वक्त केल्या. मात्र अभिनेत्रीने ही फोटो पोस्ट शेअर करताच तिला नेटकऱ्यांच्या ट्रॉलिंगचा सामना करावा लागत आहे. रुचिराने ईदच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केल्यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
अभिनेत्रीच्या पोस्टवर लागोपाठ “अनफॉलो”, “हिला अनफॉलो करा” अशा कमेंट्स येऊ लागल्यात. याशिवाय “इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये धर्मो रक्षति रक्षित: लिहायचं आणि इकडे ईदच्या शुभेच्छा द्यायच्या, किती तो विरोधाभास?”, “धर्मो रक्षति रक्षित: फक्त बायोमध्ये लिहिण्यासाठी नाही तर त्याचे पालनही केलं पाहिजे”, “इतके मराठी सण आहेत मग ईद मुबारक वगैरे कशाला?” अशा अनेक कमेंट्स करत रुचिरा ट्रोल केलं आहे.
या पोस्टखाली अनेक नकारात्मक कमेंट्स येताच अभिनेत्रीने कमेंट्समध्ये तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “कमेंट्समध्ये लोकांचा इतका द्वेष पाहून मला धक्काच बसला आहे. पण ठीक आहे. मी या फोटोमध्ये कुर्ती व त्यावर डेनीम असा पोशाख परिधान केला आहे. मी जे करत आहे ते माझं काम आहे. ‘कर्म’ आणि ‘धर्म’ पूर्णपणे समजणाऱ्यांसाठी ही पोस्ट. बाकी तुम्हा सर्वांना काय बोलावे हे मला कळत नाही”.

आणखी वाचा – रुपालीला नवीन शक्ती मिळाली, नेत्रा गरोदर असल्याचेही सत्य तिला समजणार, कुणाचा बळी की आणखी काही?
यापुढे तिने असं म्हटलं आहे की,”महाराजांचा उल्लेख करणाऱ्यांना विचारायचं आहे की, त्यांनी कधी दुसऱ्या धर्माचा अनादर करायला शिकवलं आहे का?. माझ्या बायोमधील ‘धर्मो रक्षति रक्षित:’ यावरून प्रश्न विचारणाऱ्यांना गीतेतला हा श्लोक कळला असता तर तुमची प्रतिक्रिया वेगळी असती. तुमच्या भावनांचा आदर आहेच पण याचा अर्थ असा नाही की तुमचा ‘दृष्टिकोण’ प्रत्येक वेळी योग्य असेल”.
दरम्यान, आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या रुचिराच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. रुचिरा तिचे अनेक स्टायलिश व ग्लॅमरस फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने ईदनिमित्त शेअर केलेल्या फोटोमुळे ट्रोलर्सच्या कचाट्यात अडकली आहे.