बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खानने काही महिन्यांपूर्वी प्रियकर नूपुर शिखरेशी लग्न केले. आयरा व नुपूरचे लग्न अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडले. आयरा खानच्या लग्नात वडील आमिर खान खूपच वहावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. याची एक पोस्ट आयराने शेअर केली आहे. आयराने ‘फादर्स डे’ निमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये आमिर खान आपल्या मुलीसाठी भावनिक गाणे गाताना दिसत आहे. यामध्ये आमिरबरोबर त्याचे संपूर्ण कुटुंबही दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये आमिर खानने लेकीच्या संगीतात पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद खान यांच्याबरोबर ‘फूलों का तारों का सबका कहना है’ हे गाणं गायलं. यावेळी आझाद खानने ‘एक हजारो में मेरी बेहना है’ ही ओळ गाताच आयरा खूपच भावूक झाली. त्यानंतर आमिर ‘बाबुल की दुआं लेती जा…’ हे गाणे गायले आणि यावेळी आमिर खानही भावूक झाला.
या व्हिडीओमध्ये आमिर आपल्या लेकीबद्दलच्या भावना व्यक्त करताना “आयरा खूप लवकर मोठी झाली. मला वाटतं गेल्या तीन वर्षात ती माझ्यापेक्षाही लवकर समजूतदार झाली आहे. मला खूप आनंद होतं आहे की आयरा आणि नूपुर विवाहबंधनात अडकले आहेत. ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि लग्न करत त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी खूपच आनंदी आहे” असं म्हटलं आहे.
३ जानेवारी २०२४ या तारखेला दोघांनी एकमेकांशी लग्न केले. मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न पार पडल्यानंतर उदयपूरमध्ये दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली. मुंबईत पार पडलेल्या आयरा-नुपूरच्या अनोख्या लग्नाची लग्नाची खूपच चर्चा झाली होती. मुंबईतील या लग्नात नवरदेव नुपूर शिखरे हा घरातून धावत धावत लग्नस्थळी पोहोचला होता.