आपल्या सौंदर्याने व अभिनयाने कायमच चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री चाहत खन्ना सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. दोन अयशस्वी लग्नानंतर अभिनेत्री आता पुन्हा एकदा लग करणार आहे. दोनदा लग्न मोडल्यानंतर चाहत खन्ना आता तिच्यापेक्षा चार वर्षांनी लहान अभिनेता रोहन गंडोत्राबरोबर लग्न करणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, अद्याप दोघांनीही याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहन व चाहतचे नाते कोणापासून लपलेले नाही. चाहतबरोबरच रोहनचे अभिनेत्रींच्या मुलींबरोबरही चांगले संबंध आहेत. सध्या दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. रोहनबरोबरचे नाते पुढे नेण्यासाठी चाहत तयार आहे. तसेच दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, या प्रकरणी चाहत किंवा तिचा बॉयफ्रेंड रोहन गंडोत्राकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
चाहत खन्ना ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. २८ जुलै १९८६ रोजी मुंबईत जन्मलेल्या चाहत खन्नाचे पहिले लग्न २००६मध्ये भरत नरसिंघानीबरोबर झाले होते. त्यावेळी अभिनेत्री फक्त २० वर्षांची होती. मात्र, चाहत आणि भरतचे लग्न टिकले नाही. २००७ मध्येच दोघांचा घटस्फोट झाला. या अयशस्वी विवाहानंतर चाहतने २०१३मध्ये फरहान मिर्झाबरोबर लग्न केले. मात्र, चाहत व फरहानचे नातेही फार काळ टिकले नाही. लग्नानंतर फरहान आणि चाहत यांना दोन मुली झाल्या. मात्र, २०१८ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
घटस्फोटानंतर चाहतने पतीच्या गैरकृत्यांबद्दल सांगितलं होतं. फरहान तिचं शारीरिक आणि मानसिक शोषण करायचं असं तिने म्हटलं होतं. चाहतचे तिच्या सहकलाकाराशी प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. फरहानला सोडण्याचा निर्णय योग्य होता, असं चाहतने म्हटलं होतं.
तसेच फरहान जबरदस्तीने संबंध ठेवत होता, असं चाहतने सांगितलं होतं. तिला बरं नसलं, आजारी असली तरी फरहान शारीरिक सबंध ठेवायचा, असं चाहतने म्हटलं होतं. हे सर्व मला माझ्या मुलींसाठी सहन करावे लागल्याचे तिने म्हटले होते. फरहानने मला माझ्या कुटुंबापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला हेही तिने म्हटले होते.