सध्या सिनेसृष्टीत ‘कान्स फिल्म फेस्टिवल’ची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. कला आणि फॅशन जगतातील अनेक कलावंताचा या मंचावर गौरव करण्यात आला. यंदाच्या ‘कान्स फिल्म फेस्टिवल’मध्ये भारताने बाजी मारली. तब्बल तीन दशकानंतर भारताला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळालं. ‘All We Imagine As Light’ या भारतीय चित्रपटाला कान्समध्ये नामांकन मिळालं. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या श्रेणीत पाल्मे डी’ओर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. (Chhaya Kadam On Cannes Award)
या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांची महत्त्वाची भूमिका होती. छाया कदम यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये त्यांच्या ‘All We Imagine As Light’ या चित्रपटातील भूमिकेचं कौतुक होताना दिसलं. छाया कदम यांच्या ‘All We Imagine As Light’ या चित्रपटाचा कान्स चित्रपट महोत्सवात प्रीमियर झाला आणि या चित्रपटाचा प्रीमियर संपल्यानंतर उपस्थितांनी त्यांना उभं राहून मानवंदना दिली. टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी अभिनेत्रीचे कौतुक केले.
या कौतुक सोहळ्यानंतर छाया कदम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी पुरस्कार स्वीकारतानाचे काही फोटो शेअर केले आहेत आणि त्याखाली कॅप्शन देत असे लिहिले आहे की, “आपल्या मातीतल्या आपल्या माणसांची गोष्ट आपल्या वाटेला येते तेव्हा तिच्यात जीव ओतून टाकलेला एक एक क्षण जेव्हा ‘कान्स फिल्म फेस्टीवल’ उजाळून टाकतो, तेव्हा आपल्या मागच्या सगळ्या प्रवासातल्या सगळ्या सिनेमांची, लेखकांची आणि दिग्दर्शकांची आठवण येते. कारण त्यांनी त्या-त्या वेळेस माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच एक-एक पाऊल पुढे पडत हा प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. माझ्या आजवरच्या प्रवासातल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. की तुमच्यामुळे आज ही छाया इथवर पोहोचली आहे. खूप समाधान, आनंद आणि मन भरुन आले”.
सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या श्रेणीत पाल्मे डी’ओर पुरस्कारासाठी या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे. ‘All We Imagine As Light’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पायल कपाडिया यांनी केले आहे. तर या चित्रपटात कनी कुसरुती, छाया कदम, दिव्या प्रभा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.