झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या मालिकेत मागील काही दिवसांपासून अनेक उत्कंठावर्धक वळणं येत आहेत. रुपालीला विरोचकाने नवी शक्ती दिल्यानंतर त्रिनयना देवीच्या मुली हतबल झाल्याचे पाहायला मिळाले होते. रुपालीने आपल्या नव्या शक्तीने केतकी काकु, फाल्गुनी यांच्यासह राजाध्यक्ष कुटुंबातील शेखर, तन्मय व तेजस यांनाही संमोहित केले आहे. त्यामुळे आता राजाध्यक्ष कुटुंबातील प्रत्येक माणूस रुपाली सांगत असल्याप्रमाणे वागत असल्याचे आतापर्यंत मालिकेत पाहायला मिळाले.
तसेच रुपालीला अद्दल घडवण्यासाठी नेत्रा व इंद्राणी यांनी तिला पेटीत डांबून ठेवले आहे. रुपाली समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून वश करते. रुपालीच्या या वश करण्याच्या युक्तीबद्दल नेत्रा व इंद्राणी यांना माहिती झाली असून त्यांनी रुपालीच्या डोळ्यांत तिखट मसाला टाकून तिच्या गळ्यात साखळदंड अडकवून तिला एका पेटीत डांबतानाचे पाहायला मिळाले. मात्र विरोचकाने रुपालीची या बंद पेटीतून सुटका केली आहे. अशातच मालिकेचा नुकताच आलेला एक नवीन प्रोमो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या नवीन प्रोमोमध्ये रुपालीने वश केलेला राजाध्यक्ष कुटुंबातील प्रत्येक माणूस रुपालीच्या म्हणण्याप्रमाणेच वागत आहे. त्यामुळे रुपाली केतकी काकु, फाल्गुनी, शेखर, तन्मय व तेजस यांना नेत्रा व अद्वैतसह इंद्राणीवर हल्ला करायला सांगते आणि रुपालीच्या म्हणण्याप्रमाणे हे सर्व नेत्रा, अद्वैत व इंद्राणी यांच्यावर हल्लाही करतानाचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. रुपाली “संपवा या तिघांना” असं म्हणताच फाल्गुनी नेत्रा, अद्वैत, इंद्राणी यांच्यावर चाकूने हल्ला करते तर, बाकी सगळेही त्या तिघांचा जीव घेण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून जातात.
अशातच त्या तिघांना वाचवण्यासाठी त्रियनयना देवी नेत्राच्या मदतीला धावून येतानाचे पाहायला मिळत आहे. विरोचकांचा संहार करायला त्रिनयना धावून येणार असल्याचे या नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे अखेर नेत्राच्या हाकेला देवीआई धावून आली आहे. त्यामुळे आता देवीआई व विरोचकांच्या या संहारात कुणाचा वध होणार? नेत्रा देवीआईच्या साथीने राजाध्यक्ष कुटुंबाला विरोचकाच्या तावडीतून सोडवणार का? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.