‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अनिल कपूरने हा चित्रपट सोडल्याची बातमी समोर आली. त्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पाहायला मिळाला. अनिल कपूर व ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटाचा निर्माता साजिद नाडियादवाला यांच्याबरोबर चित्रपटाच्या मानधनावरुन वाद झाला होता. ‘वेलकम’, ‘वेलकम बॅक’ या चित्रपटानंतर नाना पाटेकर व अनिल कपूर ही हिट जोडी ‘हाऊसफुल ५’मध्ये दिसणार होती. चाहतेही या जोडीला पाहायला खूप उत्सुक होते. पण आता ही जोडी पुन्हा एकत्र पाहायला मिळणार नसल्याचं समोर आलं आहे. (Anil Kapoor Leaves Housefull 5)
अभिनेता अनिल कपूर हा चित्रपट सोडणार असल्याच्या बातम्या येत आहेत. ‘हाऊसफुल ५’मध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख व अभिषेक बच्चन यांच्याबरोबर नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांनाही कास्ट करण्यात आले होते. चित्रपटात कोणते कलाकार झळकणार हे समोर येताच चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तेव्हापासून चाहते मंडळी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता या चित्रपटाबाबत खूप मोठी बातमी समोर आली आहे. ‘मिड डे’च्या वृत्तानुसार, साजिद नाडियादवाला व अनिल कपूर यांच्यात पैशांवरुन वाद झाल्याने त्याने हा चित्रपट सोडला आहे.
‘मिड डे’च्या वृत्तानुसार, अनिल कपूरने ‘हाऊसफुल ५’साठी मागितलेल्या मानधनामध्ये साजिद नाडियाडवाला सहमत नव्हते. यामुळे अनिलने चित्रपट सोडला आहे. त्यामुळे निर्माते नाना पाटेकर यांच्या व्यक्तिरेखेवर नव्याने काम करत असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात त्यांची अनिल कपूरबरोबर केमिस्ट्री दाखवली जाणार असल्याने आता त्यांची व्यक्तिरेखा पुन्हा लिहिली जात असल्याचंही समोर आलं आहे. आता अनिल कपूरच्या भूमिकेसाठी अर्जुन रामपालबरोबर चर्चा सुरु असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र निर्मात्यांकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
‘हाऊसफुल ५’ चे दिग्दर्शन तरुण मनसुखानी करणार असून चित्रपटाचे चित्रीकरण ऑगस्टपासून यूके येथे सुरु होणार आहे. २०२५मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर ‘हाऊसफुल ५’ प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.