मराठी कलाविशावतील मंडळी ही कायमच एकमेकांच्या पाठीशी उभी राहत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. ‘मनोरंजन विश्वात एकी नाही, झुंडशाही आहे’ अशी ओरड अनेकदा ऐकायला मिळते. मात्र तसे काहीही नसून अनेक कलाकार मंडळी ही आपल्या आपल्या मित्रांसाठी, मित्रांच्या चित्रपटांसाठी किंवा कलाकारांबद्दल होणाऱ्या ट्रोलिंगबद्दलही अनेकदा एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकतंच याचं एक ताजं उदाहरण पाहायला मिळाले.
अभिनेता गौरव मोरे व अभिनय बेर्डे हे दोघे मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते असून या दोघांनी नुकताच एक चित्रपट केला. ‘बॉईज ४’ या लोकप्रिय चित्रपटातून हे दोघे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. तेव्हापासून अभिनय व गौरव हे दोघे चांगले मित्र झाल्याचेही पाहायला मिळाले. दोघांनी अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो त्यांच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. त्यामुळे नुकतंच दोघांनी त्यांची ही मैत्री निभावल्याचे पाहायला मिळाले.
गौरवने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून निरोप घेत असल्याचे सांगितले होते. गौरवच्या या व्हिडीओवर त्याच्या अनेक चाहत्यांनी व मराठी कलाकारांनी त्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. अभिनेता अभिनय बेर्डेनेदेखील गौरवला “ऑल द बेस्ट लव्ह यू (तुला खूप शुभेच्छा, तुला खूप खूप प्रेम)” असं म्हणत शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र अभिनयच्या या कमेंटवर एका नेटकऱ्याने अभिनयचा अपमान करत त्याच्याविषयी नकारात्मक प्रतिक्रिया केली आणि अशातच गौरवने अभिनयचा अपमान केल्यामुळे या नेटकऱ्याला चांगलाच दम दिला आहे.

आणखी वाचा – शाब्बास पोरी!, आधी घर आणि आता गाडी, ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीकडून आई-वडिलांना पुन्हा एकदा खास सरप्राइज
एका नेटकऱ्याने अभिनयचा अपमान करत व गौरवची अभिनयबरोबर तुलना करत त्याला “गौरव एक आर्ट कलाकार आहे आणि तू फार्ट कलाकार आहेस. त्यामुळे बोलताना दादा किंवा सर म्हणून बोलायचं” असं म्हटलं. नेटकऱ्याच्या या कमेंटला अभिनयनेही उत्तर दिलं आहे व गौरवनेदेखील. अभिनयने नेटकऱ्याच्या या कमेंटला उत्तर देत असं म्हटलं आहे की, “विनोदाचा प्रयत्न खूप चांगला आहे पण गौऱ्या ‘आर्ट’ नाही तर ‘ऑल राऊंडर’ (सर्वगुणसंपन्न) कलाकार आहे.”
तर गौरवनेही या नेटकऱ्याला प्रतिउत्तर देत त्याचा चांगलाच समाचार घेतला. गौरवने नेटकऱ्याच्या कमेंटला “आपण कोणाशी बोलतोय याचं भान ठेवा. अभिनय बेर्डे हे एक प्रतिष्ठित नाव आहे. त्यामुळे जरा जपुन बोला” असं म्हणत त्याला सूचनावजा दम दिला आहे. दरम्यान, गौरव व अभिनय हे दोघे ‘बॉईज ४’ या चित्रपटात एकत्र झळकले होते. या चित्रपटातून त्या दोघांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या चित्रपटातील मैत्री त्यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यातदेखील निभावली आहे.