‘I am a गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा, टा ना ना ना…’ या वाक्याने अनेकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण करणारा विनोदी अभिनेता म्हणजे गौरव मोरे. छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून गौरवला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या शोमधून त्याने अनेक स्किट्सद्वारे प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले. आपल्या विनोदाच्या अनोख्या शैलीने त्याने अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. अशातच गौरवने या कार्यक्रमातून निरोप घेत असल्याचे जाहीर केले.
गौरवने नुकतीच एक पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “रसिक प्रेक्षक आपण या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं. सन्मान दिला. त्याबद्दल मी व माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत. मला सांगताना खूप वाईट वाटत आहे की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधुन आपला निरोप घेत आहे. माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो.”
गौरवच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांसह त्याच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत दु:ख व्यक्त केले आहे. तर काहींनी त्याच्या एक्झिटवर नापसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्याला उपदेशवजा सूचनाही दिल्या आहेत. याबद्दल गौरवच्या एका चाहत्याने कमेंट करत “ओंकार भोजनेसारखा चुकीच्या शोमध्ये जाऊन स्वत:ची प्रतिमा खराब करून घेऊ नका भाऊ. तुम्ही हास्यजत्रेमध्येच शोभता. तरी हा आपला वैयक्तिक निर्णय. शुभेच्छा” असं म्हटलं आहे. चाहत्याच्या या कमेंटला गौरवने “प्रत्येक गोष्टीला कारण असतात दादा” असं म्हणत उत्तर दिलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे, भूषण कडू, ओंकार भोजने यांच्यापाठोपाठ गौरव मोरेनेही या शोमधून काढता पाय घेतला आहे. या शोनंतर विशाखा या छोट्या पडद्यावरील एक मालिकेतून नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. तर ओंकार भोजनेही इतर वाहिनींच्या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
आणखी वाचा – अप्पी-अर्जुन एकत्र येण्यासाठी अमोलचं छत्रपती शिवाजी महाराजांना गाऱ्हाणं, हातही जोडले, एकत्र येणार का?
अशातच गौरव मोरेही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोनंतर त्याच्या मॅडनेस मचाएंगे’ या शोमधून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे त्याचे अनेक चाहते त्याच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शो सोडण्याच्या निर्णयावर नाराज आहेत, तर काही चाहते त्याच्या या नवीन प्रवासानिमित्त त्याला शुभेच्छाही देतानाचे पाहायला मिळत आहे.