मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरु असताना काही दिवसांपूर्वीच एक मराठमोळी कलाकार जोडी लग्नबंधनात अडकलेली पाहायला मिळाली. ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम चेतन वडनेरे अभिनेत्री ऋजुता धारपसह विवाह बंधनात अडकला. २२ एप्रिल रोजी ऋजुता व चेतन यांचा शाही विवाहसोहळा नाशिक येथे संपन्न झाला असल्यास समोर आलं. दोघांच्या लग्नाची विशेष चर्चाही रंगलेली पाहायला मिळाली. यापूर्वी लग्नाची कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांनी थेट लग्नसोहळा उरकला. सोशल मीडियावरुन त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी त्यांनी शेअर केली. (Chetan Vadnere Answers to Fan)
ऋजुता व चेतन हे त्यांच्या लग्नानंतर बरेच चर्चेत आलेले पाहायला मिळाले. सोशल मीडियावरही ही जोडी बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच चेतनने नुकताच इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी सेशन’द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तर चेतनने दिली. दरम्यान अभिनेत्याला त्यांच्या लग्नाबाबत अनेक प्रश्न विचारले गेले. यावेळी विचारल्या गेलेल्या नेटकऱ्याच्या एका खटकणाऱ्या प्रश्नाला उत्तर देत त्याने चांगलंच सुनावलेलं पाहायला मिळत आहे.

नेटकऱ्याने प्रश्न विचारत म्हटलं की, “ऋजुता लग्न झालं तरी साडी वगैरे नेसत नाही का? किती छान मुली सारखं वागणूक देत आहेत तुमचे मम्मी पप्पा”. यावर चेतनने चांगल्याच शब्दात सडेतोड उत्तर देत त्या चाहत्याला म्हटलं, “धन्यवाद. पण लग्नाचा आणि साडीचा खरंतर संबंध नाही आहे. माझ्या नऊवारी नेसणाऱ्या आजीने माझ्या सहावारी नेसणाऱ्या आईला समजून घेतलं. तसंच माझ्या सहावारी नेसणाऱ्या आईने पंजाबी ड्रेस, जीन्स-टॉप घालणाऱ्या माझ्या बायकोला समजून घेतलं आहे. कोणते कपडे वापरायचे ही ज्याची त्याची आवड असते, लग्नाआधी असो किंवा लग्नानंतर…कपडे घालणं हे केवळ फॅशनचा भाग आहे”, असं म्हणत त्याने नेटकऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं.
‘झी युवा’ वाहिनीवर ‘फुलपाखरू’ या मालिकेत चेतन व ऋजुता एकत्र दिसले. या मालिकेत दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली. आणि कालांतराने या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघेही मूळचे नाशिकचे असल्याने त्यांनी नाशिक येथे लग्न केले.