बॉलिवूड अभिनेता अजय देवगण व आर. माधवन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘शैतान’ हा चित्रपट ८ मार्च २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. काळी जादू, वशीकरण यावर आधारित असलेल्या या कथानकाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली. तसेच या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बॉक्स ऑफिसवर गाजलेला हा चित्रपट आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
त्यामुळे ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहता आला नव्हता त्यांना आता हा घरबसल्या ओहता येणार आहे. या चित्रपटाने जागतिक स्तरावर तब्बल २१५ कोटींची कमाई केली आहे. आजपर्यंत नायक म्हणून लोकप्रिय ठरलेल्या आर माधवनने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. ‘शैतान’ ओटीटीवर कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

‘शैतान’ हा चित्रपट येत्या ३ मे रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे. शैतान हा भय व थरारपट ‘वश’ या गुजराती चित्रपटाचा रीमेक आहे. ‘वश’ हा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता, परंतु हा चित्रपट मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही. ‘वश’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या जानकी बोडीवालाने ‘शैतान’मध्येसुद्धा जान्हवी हे पात्र साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
दरम्यान, हा चित्रपट अंधविश्वास, काळी जादू, वशीकरण या सर्व गोष्टींवर आधारित असल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटात अजय देवगण एका पित्याची भूमिका साकारत आहे. तर आर. माधवन वनराज नावाच्या खलनायकाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात ज्योतिका सदाना-सर्वणन, जानकी बोडीवाला, अंगद राज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.