७२ मैलाचा एक प्रवास करत मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भारावून टाकणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता तांबे. ‘७२ मैल एक प्रवास’ यासह ‘जोगवा’, ‘देऊळ’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘नूर’, ‘पंगा’, ‘जवान’, ‘जोरम’ अशा मराठी-हिंदी चित्रपटांमधून स्मिताने अभिनय करत मराठीसह हिंदी प्रेक्षकांचेदेखील मनोरंजन केले आहे. चित्रपटाच्या मोठ्या पडद्याबरोबरच टीव्हीचा पडदाही गाजवला आहे. याचबरोबर वेबविश्वातही विविधांगी भूमिका साकारत तिने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे.
स्मिताने आजवर साकारलेल्या प्रत्येक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. तिची प्रत्येक भूमिका ही समीक्षकांसह प्रेक्षकांनाही विचार करायला लावणारी होती. अभिनेत्री तिच्या अभिनयाने जितकी चर्चेत असते तितकीच ती तिच्या बिनधास्त व बेधडक वक्तव्यांनीदेखील चर्चेत राहत असते. अशातच नुकतीच तिने ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखातीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या भूमिकांसह अनेक विषयांवर मुक्तपणे संवाद साधला.
यावेळी ती असं म्हणाली की, “आयुष्यात कधीही किसींग सीन करताना मला माहीत आहे मी अजिबात अस्वस्थ नसणार. ‘कँडल मार्च’ चित्रपटात मी निलेश दिवेकरबरोबर माझा इंटीमेट सीन होता आणि तेव्हा सेटवर सगळे थोडे लज्जित झाले होते पण मला अजिबात विचित्र वाटलं नाही. तेव्हा मी निलेशलादेखील सांगितले. असे सीन शूट करताना मला लाज वाटत नाही याचे कारण म्हणजे त्या पात्राचा सरावाचाच तो एक भाग आहे. “
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “ज्याप्रमाणे त्या पात्राची भांडं उचलण्याची विशिष्ट पद्धत असते, पाणी पिण्याची पद्धत असते किंवा उठण्याची, बसण्याची लकब असते. त्याचप्रमाणे हे दृश्यसुद्धा अगदी सहज आहे. त्या चित्रपटातील कथेनुसार जर ते इंटीमेट दृश्य येत असेल तर ते कधीही विचित्र किंवा वल्गर वाटणार नाही.”
दरम्यान, आपल्या नानाविध चित्रपटांमधून कायमच प्रेक्षकांसाठी नवनवीन भूमिका घेऊन येणारी स्मिता तांबे लवकरच कासरा या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. स्मितानेन आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून सशक्त अभिनय केला आहे. त्याच पठडीतील ‘कासरा’ चित्रपटातही तिची महत्त्वाची भूमिका आहे.