स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेसह मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात अक्षरश: घर केले. या मालिकेत अभिनेत्री कोमल कुंभारने अंजी ही भूमिका साकारली होती. तिची ही ठसकेबाज भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अंजी या पात्रामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियादेखील तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर आपल्या कामानिमित्त काही माहितीही शेअर करत असते.
अशातच कोमलने नुकताच तिच्या सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला असून हा फोटो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. कोमलने तिच्या घरातील अंगणात बसून काढलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा खास फोटो शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “गाव, शांतता, रात्र, निसर्गाचा आवाज हे सगळं मिळून अंतरीचे भाव तयार होतात.” कोमलने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचे भव्य घराची झलक पाहायला मिळत आहे.
कोमलने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचे दुमजली भव्य घर दिसत आहे. घरासमोर मोठं अंगणदेखील आहे. त्याचबरोबर घराभोवती अनेक झाडेदेखील असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये ती अंगणात चटई टाकून बसली आहे. गावात सुट्टीचा आनंद घेतानाचे आनंदी भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. दरम्यान, कोमल सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अबोली’ या मालिकेतून पेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत तिच्या भूमिकेचे नाव मनवा असं असून मनवा ही अंजीप्रमाणेच ठसकेबाज आहे.
‘अबोली’ या मालिकेआधी कोमलनं ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील अंजली (अंजी) ही भूमिका साकारली आहे. या मालिकेत गौरी कुलकर्णी, सचित पाटील, प्रतिक्षा लोणकर, मौसमी तोंडवळकर, शर्मिष्ठा राऊत, संदेश जाधव, अपर्णा अपराजित आदी कलाकारांनीदेखील महत्वाची भूमिका साकारली आहे.