वैज्ञानिकदृष्ट्या, सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना मानली गेली आहे. जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला ‘सूर्यग्रहण’ असं म्हणतात. तेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. याला ‘सूर्यग्रहण’ म्हणतात. चंद्रग्रहणाच्या तुलनेत हे सूर्यग्रहण अतिशय लहान भौगोलिक क्षेत्रात दिसते, ज्यामुळे ते प्रत्येकवेळी खास असते.
येत्या ८ एप्रिल रोजी हे सूर्यग्रहण होणार असून हे सूर्यग्रहण अत्यंत दुर्मिळ आहे. यंदाचे हे सूर्यग्रहण मेक्सिको, अमेरिका व कॅनडामध्ये दिसणार आहे. अमेरिकेत ८ एप्रिल रोजी होणारे सूर्यग्रहण हे अत्यंत दुर्मिळ व विशेष आहे. कारण हे सूर्यग्रहण पाहण्यास लोक मुकले तर पुढील सूर्यग्रहणासाठी त्यांना तब्बल २० वर्षे वाट पाहावी लागेल. यापूर्वी २०१७ मध्ये अमेरिकेत संपूर्ण सूर्यग्रहण दिसले होते. त्यामुळे आताचे सूर्यग्रहण जर पाहू शकले नाही तर पुढील सूर्यग्रहणासाठी लोकांना २३ ऑगस्ट २०४४ पर्यंत वाट पहावी लागू शकते.
यंदाचे सूर्यग्रहण खास आहे, कारण यंदाच्या सूर्यग्रहणाचा कालावधी हा मागील सूर्यग्रहणापेक्षा जास्त असेल. संपूर्ण सूर्यग्रहण हे चंद्रग्रहण किंवा कंकणाकृती सूर्यग्रहणापेक्षा जास्त प्रभावी असेल. या सूर्यग्रहणादरम्यान चंद्र सूर्याला व्यापणार आहे. पण त्याच्या बाह्य कडा दिसतील. त्यामुळे आकाशात आगीच्या वलयासारखे काहीतरी दिसेल. त्यामुळे ८ एप्रिलला होणाऱ्या सूर्यग्रहणाची अनेक खगोलप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, नासाच्या अंदाजानुसार, २०१७ सालचे सूर्यग्रहण हे जवळपास २८५ दशलक्ष लोकांनी पाहिले होते. यंदाचे हे सूर्यग्रहण देलास, क्लीव्हलँड बफेलो व न्यूयॉर्क या शहरांमधून जाणार आहे. त्यामुळे ज्या शहरांमध्ये हे पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. त्या शहरांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी देण्याची मागणीही करण्यात आली आहे.