छोट्या पडद्यावरील मालिका या अनेक प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतात. आजही असा एक प्रेक्षक वर्ग आहे जो रोज नित्यनियमाने मालिका बघतो आणि त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो. मालिकेतील कथानकाचा किंवा पात्राचा स्वतःच्या आयुष्याशी संबंध लावतात. अशीच एक मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते?’. छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते?’ ही मालिका गेले काही दिवस चांगलीच चर्चेत आहे. मालिकेतील आशुतोष म्हणजेच अभिनेता ओंकार गोवर्धनच्या एक्झिटवर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
अशातच अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मधुराणीने इन्स्टाग्रामवर ओंकार गोवर्धनबरोबरचे खास पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “आशुतोषचं ‘जाणं’ अनेकांना आवडलं नाही. कसं आवडेल?. आपल्याला आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीतच… पण त्या स्वीकाराव्या लागतातच. तसंच आशुतोष जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल. अरुंधतीला आशुतोषची आठवण येत आहे, तशीच आम्हा सगळ्यांनाही ओंकारची तितकीच आठवण येत आहे”
मधुराणीच्या या पोस्टखाली अनेकांनी कमेंट्सवारे आपली प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. यात अनेकांनी मालिकेबद्दल त्यांची मतं व्यक्त केली आहेत. “मला असं वाटतं आता आईने कुठंच काही करू नये. मालिकेतून ब्रेक घेत घरी थांबावं. कारण अरुंधतीचं तिसरं लग्नं आम्ही बघू शकत नाही, बंद करा ही मालिका. घटस्फोट झाला आहे, तरी सासरी राहतात आणि प्रत्येकाची दोन दोन लफडी दाखवतात हे सगळं अतार्किक आहे, तुमच्या या मालिकेत एका सुद्धा जोडप्याचे सुखी आयुष्य नाही, ही मालिका बघणारे डोक्यावर पडले आहेत” अशा अनेक नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, काहींनी मात्र आशुतोष अर्थात ओंकार गोवर्धनची आम्हाला आठवण येत असल्याचेही म्हटले आहे. “अरे हे इतकं दुःखदायक आहे की, मी स्वतः काहीतरी गमावलं आहे असं मला वाटत आहे. तुम्ही दोघेही मलिकेत खुप छान काम करता. तुमची जोडी खुप छान होती. आम्हाला तुमची आठवण येईल.” अशा सकारात्मक कमेंट्स करत आम्हाला आशुतोषची कायम आठवण येईल असं म्हटलं आहे.