स्टार प्रवाह वाहिनीने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांची मेजवानी प्रेक्षकांना दिली आहे. त्यापैकीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘कुण्या राजाची तू गं राणी’ ही मालिका. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेच्या कथानकाने तसेच मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आपले अधिराज्य गाजवले. मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.
नुकताच १६ मार्च रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. त्यामुळे प्रेक्षकांचा निरोप घेताना या मालिकेतील कलाकार भावुक झालेले पाहायला मिळाले. मालिकेतील कबीर म्हणजेच अभिनेता हर्षद अतकरी आणि गुंजा म्हणजेच अभिनेत्री शर्वरी जोग यांनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्यामुळे भावुक पोस्ट शेअर केल्या आहेत. हर्षद व शर्वरी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे काही खास आठवणी शेअर केल्या आहेत.
अभिनेता हर्षदने मालिकेतील त्याच्या पात्राचे फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “प्रत्येक कथेचा, प्रत्येक पात्राचा स्वतःचा प्रवास असतो. कबीरचा प्रेक्षकांबरोबरचा प्रवास संपत आला आहे. मी आजवर साकारलेलं हे सर्वात जोखमीचं आणि गुंतागुंतीचं पात्र होतं हे मला मान्य आहे. मला ही संधी दिल्याबद्दल स्टार प्रवाहचे खूप खूप धन्यवाद. कबीर आणि ‘कुण्या राजाची तू गं राणी’ प्रेक्षकांच्या हृदयात कायम राहतील याची मला खात्री आहे. नवीन कथा तसेच नवीन भूमिका मिळेपर्यंत सर्वांना अलविदा”.
तर अभिनेत्री शर्वरीनेही गुंजाच्या भूमिकेतील काही फोटो शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने असं म्हटलं आहे की, “आज ‘कुण्या राजाची गं तू राणी’ मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होत आहे. या मालिकेने मला खूप काही दिलं. गुंजाकडून तर शिकण्यासारख्या खूप गोष्टी होत्या. गुंजाने मला अभिनेत्री म्हणून किती समृद्ध केलं हे माहिती नाही, पण माणूस म्हणून तिने मला नक्कीच खूप गोष्टी शिकवल्या. आज प्रवास जरी थांबत असला, तरी गुंजा आणि तिचं सगळं कुटुंब कायम माझ्या आठवणीत राहील. गुंजावर, या मालिकेवर, तिच्या कुटुंबावर तुम्ही (प्रेक्षकांनी) जसं भरभरून प्रेम केलं तसंच प्रेम यापुढेही कराल हे नक्की”.
आणखी वाचा – सिद्धू मुसेवालाच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन, गायकाच्या आईने दिला बाळाला जन्म, वडिल फोटो शेअर करत म्हणाले…
दरम्यान, चाहत्यांनीही या पोस्टला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी “ही मालिका आमच्या कायम आठवणीत राहील. गुंजा व कबीर यांची आम्ही आठवण काढू, ही मालिका संपायला नको होती, माझी आवडती मालिका संपत आहे याचे वाईट वाटत आहे” अशा अनेक कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे.