देशात उपाशीपोटी झोपणाऱ्यांची वाढती संख्या आणि अन्नाची प्रचंड नासाडी या समाजातील एकाच नाण्याच्या दोन बाजू कमालीच्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. भारतीय संस्कृतीत अन्नाला पूर्णब्रम्ह मानले आहे. अनेक संत-महंतांनी त्यांच्या अभंगांमध्येही त्याचे वर्णन केले आहे. तथापि सार्वजनिक जीवनात नेमके याच्याविरुद्ध प्रदर्शन आढळते. सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ, लग्नसोहळे किंवा सामूहिक पार्ट्या यात अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. अन्न फेकून देण्याची चढा-ओढ लागते. शिळे अन्न लोक बिनदिक्कतपणे कचराकुंडीत टाकतात.
त्यामुळे पोटाला लागेल तितकेच घ्यावे आणि खावे हा संस्कार लोक विसरले असावेत का? असा प्रश्न पडतो आणि याचबद्दल मराठीतील एका सप्रसिद्ध अभिनेत्रीने आपली नाराजी व खंत व्यक्त केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे दीप्ती देवी. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात एक माणूस फेकून दिलेले किंवा वाया घालवलेले अन्न एकत्र करत आहे. अभिनेत्रीने हाच फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “स्वत:च्या पैशांची पाणीपुरी विकत घेतली तर थाळीतले पाणीही पितात, आईस्क्रीम घेतली तर त्याचे झाकणही चाटतात किंवा शेंगदाणेदेखील घेतले तर त्याचे टर्फल पण सोडत नाही, मग कुणाच्या लग्नसमारंभात अन्न का वाया घालवतात?”

आणखी वाचा – “मी त्यांच्यासारखी नाही”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा जया बच्चन यांना टोमणा, म्हणाल्या “मी त्यांच्यापेक्षा खूप…”
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “लग्न समारंभातील अन्नासाठी कुणाच्या तरी बापाने आयुष्य कष्ट करुन घालवलेले असते. म्हणून हात जोडून विनंती आहे की, जेवढी भूक असेल आणि पोटात जितकं मावेल तितकंच अन्न घ्या. कृपया अन्न वाया घालवू नका. अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे.” या फोटोद्वारे तिने अन्न वाया घालवणाऱ्या व अन्नाची नासाडी करणाऱ्या लोकांना सणसणीत चपराक तर लावलीच आहे. पण याचबरोबर तिने लोकांना अन्न वाया न घालवण्याची विनंतीही केली आहे.
दरम्यान, मराठीबरोबरच हिंदी मालिका व चित्रपटांमधून हटके भूमिका करत दीप्तीने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान मिळवलं आहे. दिप्तीने मोजक्याच पण दमदार भूमिका करत सिनेसृष्टीला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. नुकत्याच आलेल्या ‘नाळ भाग २’ चित्रपटात अभिनेत्री झळकली होती. ‘मला सासू हवी’ या मालिकेतून् दीप्ती खऱ्या अर्थाने घराघरांत पोहोचली. मग ‘अंतरपाट’,‘परिवार’,‘बडे अच्छे लगते है’ या मालिका तसेच ‘नाळ’, ‘कंडिशन्स अप्लाय’, ‘मंत्र’ ‘चंपक’ या चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.