बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. सध्या तिचे नाव शिखर पहाडियाबरोबर जोडले जात आहे, कारण दोघेही अनेकदा काही कार्यक्रमादरम्यान एकत्र दिसले आहेत. नुकतीच ही जोडी हैद्राबादमधील एका मंदिरातही एकत्र दिसली होती. अशातच आता शिखर पहिल्यांदाच जान्हवीचे वडील बोनी कपूरबरोबर दिसला. मात्र बोनी कपूर यांनी तो माझ्याबरोबर नसल्याचे म्हटले.
बोनी कपूर यांनी नुकतीच त्यांच्या केसांवर उपचार केले. त्यांच्यावर हैद्राबादमध्ये हे उपचार झाले. त्यांनी स्वत: त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना माहिती दिली, मात्र नंतर त्यांनी तो व्हिडीओ डिलीट केला. यादरम्यान हैद्राबादमधून मुंबईत परतल्यावर बोनी कपूर हे मुंबई विमानतळावर शिखर पहाडियाबरोबर दिसले. यावेळी पापाराझींनी त्यांचे काही फोटोदेखील काढले.
यावेळी पापाराझींनी बोनी कपूर यांना शिखरबरोबर फोटो काढण्यासाठी विचारले असता, बोनी कपूर यांनी “तो माझ्याबरोबर नाही आहे, त्यामुळे त्याचे फोटो किंवा व्हिडीओ कुठे पोस्टही करु नका” असं म्हणाले. बोनी कपूर व शिखर पहाडिया यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे.
जान्हवी व शिखर यापैकी दोघांनीही अद्याप आपलं नातं अधिकृत केलेलं नाही. मात्र अनेकदा हे दोघे एकत्र दिसतात. याशिवाय अनेकदा जान्हवी शिखरबरोबर पार्टीला जाताना आणि एकत्र वेळ घालवताना दिसते. काही दिवसापूर्वी जान्हवीनं ‘कॉफी विथ करण सीझन ८’मध्ये शिखरचं नाव घेतलं होतं. तेव्हा पासून या दोघांच्या नात्याबद्दलच्या नेक चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, बोनी कपूर यांची निर्मिती असलेला ‘मैदान’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. यात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. तर जान्हवी आगामी काळात ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’, ‘मिस्टर अँड मिसेस माही’, ‘उलझन’, ‘आरसी १६’ व ‘देवारा : भाग १’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.