अभिनेता विकी कौशल व अभिनेत्री कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील एक ‘क्युट कपल’ आहे. खूप काळ एकमेकांना डेट केल्यानंतर विकी व कतरिनाने २०२१ मध्ये लग्न केले. दोघांच्याही नात्याबद्दल अनेक खुलासे माध्यमांसमोर होत असतात. दोघांचे असलेले गोड नाते, एकमेकांना समजून घेण्याची भावना, ते दोघे एकत्रित वेळ कसा घालवतात? याबद्दल अनेक चर्चा होत असतात. अशातच विकीने एका मुलाखतीमध्ये दोघांच्या नात्यावर भाष्य केले आहे. (Vicky Kaushal on Katrina Kaif)
मूळ भारतीय नसलेली कतरिना आता अस्सल पंजाबी सून झाली आहे. घरातील रीतीरिवाजही आनंदाने पाळत असते. लग्नानंतर तिच्यामध्ये कमालीचा बदल दिसून येत आहे. घरातील सर्वांची ती आपुलकीने काळजी घेत असते आणि सर्वांच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवायला तिला खूप आवडतात असे अनेकदा कौशल कुटुंबाने मुलाखतींमध्ये सांगितले आहे. पण आता विकी व कतरिना यांचे नाते चर्चेत येण्याचे कारण थोडे वेगळे आहे.
नुकताच विकीने माध्यमांसमोर दिलेल्या मुलाखतीमध्ये कतरिनाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “लग्नानंतर आयुष्यावर नक्की काय परिणाम झाला?” असं विचारण्यात आलं. यावर विकी म्हणाला की, “लग्नानंतर व्यक्ती कधीही एकसारखी राहत नाही. आपण आपले आयुष्य कोणाबरोबर तरी जगणार आहोत ही एक वेगळी भावना असते. लग्नाआधी फक्त तुम्ही असता. तुमचा दिनक्रम, तुमचे विचार, तुमचे निर्णय हे फक्त तुमचे असतात. पण तुम्ही जेव्हा लग्न करता तेव्हा तुम्ही ‘दोघं’ असता. लग्नानंतर तुमचे आयुष्य बदलते”.
यापुढे तो असं म्हणाला की, “लग्न झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांच्या विचारांशी सहमत असणे गरजेचे आहे. तरच तुम्ही आनंदी व शांत राहू शकता. त्यामुळे मी एवढंच सांगेन की आता पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही. लग्नानंतर मी इतका समजूतदार झालो आहे, की माझ्या आयुष्याच्या ३३ वर्षांमध्ये झालो नव्हतो”, असं म्हणत विकी कतरिनाचं कौतुक केलं.
पुढे त्याने सांगितले की, “कतरिना खूप धीर धरू शकते. तिचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोण वेगळा आहे. माझ्या १० पैकी ८ वेळा मला असं वाटतं की या गोष्टीचा एक वेगळा दृष्टिकोण असू शकतो पण माझा स्वभाव असा आहे की मी त्या गोष्टीवर अडूनच बसायचो. जसे की जेवण ऑर्डर करणे, सुट्टीला कुठे जायचं अशा साध्या गोष्टींचा समावेश असायचा. पण आता आम्ही हे सर्व चर्चा करूनच ठरवतो”, असं सांगून विकीने आपल्या सुखी संसाराचे गमक सांगितले आहे.