सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय कपल आज विवाहबंधनात अडकलं आहे. जॅकी भगनानी व रकुल प्रीत सिंग या दोघांनी सप्तपदी घेत लग्नसोहळा उरकला आहे. आज २१ फ्रेब्रुवारी बुधवार रोजी त्यांच्या कुटुंबातील सदस्य व जवळच्या मित्र मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला आहे. रकुल व जॅकी यांनी त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारताबाहेर न जाता गोव्याची निवड केली. (Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding)
‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, रकुल व जॅकी यांचे लग्न पारंपरिक अंदाजात आनंद कारज पद्धतीने पार पडले. दोघांनी सिंधी पद्धतीने हा सोहळा उरकला असल्याचं समोर आलं आहे. या नववधूवराच्या लग्नसोहळ्यात फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. त्यांच्या चाहत्यांना लग्नातील लूक पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. रकुल व जॅकी यांच्या लग्नसोहळ्याची सुरुवात हळदी समारंभाने झाली. त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात होताच त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
त्यांनतर दोघांच्या मेहेंदी व संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोघांच्या जवळच्या मित्र मंडळींनी व कुटुंबियांना धमाल केली. जॅकी व रकुलच्या संगीत सोहळ्यात, शिल्पा शेट्टीने तिचा पती राज कुंद्रासह परफॉर्म केले. याशिवाय या दोघांच्या लग्नसोहळ्याला अनन्या पांडे, आदित्य रॉय कपूर, वरुण धवन, रितेश देशमुखसारखे बॉलिवूड सेलिब्रिटीही गोव्याला जाताना दिसले.
दरम्यान, रकुल प्रीत सिंगने अलीकडेच ‘योग्य जोडीदार’ असण्याचे महत्त्व सांगितले. अभिनेत्रीने ‘कॉस्मोपॉलिटन इंडिया’शी बोलताना स्पष्ट केले की, “महत्त्वाकांक्षी महिलांनी केवळ समजून घेणारा नव्हे तर जबाबदाऱ्या वाटण्यासाठी तयार असणारा जोडीदार निवडावा. योग्य जोडीदार मिळणे महत्त्वाचे आहे.”