बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने काही दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिला. विराट व अनुष्काने याबाबतची पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. यामध्ये त्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘अकाय’ असे ठेवले असल्याचं सांगितले. बाळाच्या आगमनाच्या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दोघांनाही आधी एक मुलगी असून तिचे नाव ‘वामिका’ आहे. विराट-अनुष्काच्या दुसऱ्या बाळाचे आगमन होताच चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाचा स्टार बनवलं आहे. (Anushka and Virat new born baby)
विराट व अनुष्का यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. यासह दोघांच्या नावांनी तसेच मुलगी वामिकाच्या नावानेदेखील अनेक फॅनपेज आहेत. पण आताच आलेल्या ज्युनिअर कोहलीच्या म्हणजे अकायच्या नावाने अनेक फॅनपेज सुरू करण्यात आले आहेत. ‘रेडिट’वर एका युजरने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ‘काही मिनिटांतच इन्स्टाग्रामवर अकाय कोहलीच्या अकाऊंट्सचा अक्षरशः पुर आला आहे” असे लिहिण्यात आले आहे.
दरम्याने विराट व अनुष्का या जोडीने लंडनमध्ये दुसऱ्या बाळाला जन्म दिला. जन्म दिल्यानंतर पाच दिवसांनी मुलगा झाल्याची पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “आम्हाला खूप आनंद होत आहे. १५ फेब्रुवारीला आम्ही आमचा मुलगा अकाय व वामिकाच्या लहान भावाचे या जगात स्वागत केले आहे. आमच्या जीवनातील या सुंदर क्षणांना तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा राहू देत. आमच्या गोपनियतेचा सन्मान कराल अशी विनंती करतो. प्रेम व आभार”. इन्स्टाग्रामवर पोस्ट व्हायरल होताच मुलगा अकायच्या नावाचा नेमका अर्थ काय? अशी चर्चादेखील रंगली.
अनुष्का व विराट यांनी ११ डिसेंबर २०१७ रोजी इटली येथे कुटुंबियांच्या साक्षीने लग्नगाठ बांधली. २०२१ रोजी अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे नाव ‘वामिका’ ठेवलं. पण या जोडीने दुसऱ्या बाळाच्या बातमीबाबत मौन पाळलं होतं. गेले कित्येक महिने अनुष्काच्या प्रेग्नंसीच्या बऱ्याच चर्चा रंगल्या. अखेरीस सुंदर पोस्ट शेअर करत विराट-अनुष्काने त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झालं असल्याचं जाहिर केलं आहे.