क्रिकेट जगतातुन नुकतीच एक आनंदवार्ता समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा लोकप्रिय व प्रसिद्ध चेहरा क्रिकेटपटू विराट कोहलीला पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. गेले काही दिवस विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा ही प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू होती. तेव्हापासून विराटसह अनुष्काच्या चाहत्यांना नवीन पाहुण्याची चाहूल लागली होती. अशातच काल (२० फेब्रुवारी) रोजी विराट-अनुष्का यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.
१५ फेब्रुवारीला अनुष्काने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाचा जन्म झाल्यावर पाच दिवसांनी विरुष्काने ही गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. विराट-अनुष्का यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “खूप आनंदाने व प्रेमाने भरलेल्या अंतःकरणाने, आम्हाला सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या लहान मुलाचे ‘अकाय’ म्हणजेच वामिकाच्या लहान भावाचे या जगात स्वागत केले! आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात आम्ही तुमचे आशीर्वाद व शुभेच्छा मागत आहोत. यादरम्यानच्या काळात आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या गोपनीयतेचा आदर करावा.”
तसेच यापुढे विराट-अनुष्का यांनी चाहत्यांप्रती प्रेम व कृतज्ञतादेखील व्यक्त केली आहे. विराट-अनुष्का यांनी ही गोडी बातमी देताच त्यांच्यावर अनेक कलाकार, खेळाडू तसेच असंख्य चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव सुरु झाला आहे. चाहत्यांनी या पोस्टखाली कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विराट-अनुष्का यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करताच त्यांच्या या नवीन बाळाच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. विराट-अनुष्का यांच्या बाळाच्या नावाचा नेमका अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दरम्यान, विराट-अनुष्का यांनी २०१७ साली लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी त्यांची पहिली मुलगी ‘वामिका’ला जन्म दिला. त्यानंतर आता फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांनी त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत केले आहे. विराटने केलेल्या पोस्टवर चाहत्यांसह मनोरंजन आणि क्रिडा विश्वातील अनेकांनी कमेंट ‘विरुष्का’चे अभिनंदन केले. कोहली कुटुंबातील या नव्या सदस्याचे स्वागत करण्यासाठी काहीच मिनिटांत लाखो कमेंट्स या पोस्टवर आल्या आहेत.