फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून साजरा केला जातो. अशातच नुकताच व्हॅलेंटाईन डे प्रेमीयुगुलांनी जोरात साजरा केला. बऱ्याच कलाकार मंडळींनी त्यांच्या प्रियकराबरोबर फोटो पोस्ट करत यंदाचा व्हॅलेंटाईन डे साजरा केलेला पाहायला मिळाला. तर काहींनी प्रियकराला सरप्राइज देत, तर काहींनी डिनर डेटला जात हा दिवस साजरा केला. अशातच एका लोकप्रिय जोडीच्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल पोस्टने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate)
‘आमचं ठरलं’ म्हणत काही दिवसांपूर्वी प्रेमाची जाहीर कबुली देणारी ही लोकप्रिय जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. मुग्धा व प्रथमेश यांनी काही दिवसांपूर्वीचं त्यांचा शाही विवाहसोहळा उरकला. डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करत कुटुंबिय व कलाक्षेत्रातील मंडळींच्या उपस्थितीत दोघांचा लग्नसोहळा उरकला. प्रथमेश व मुग्धा यांच्या लग्नातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत होते.
यानंतर प्रेक्षकांच्या या लाडक्या जोडीने आता प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डेही साजरा केला आहे. सोशल मीडियावर दोघांनी एकत्र एक फोटो शेअर करत एकमेकांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या. याशिवाय या खास दिवशी प्रथमेश व मुग्धा डिनर डेटलाही गेलेले पाहायला मिळाले. दोघांनी त्यांच्या या स्पेशल डिनर डेटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलेले पाहायला मिळत आहेत.

प्रथमेश व मुग्धा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच काही ना काही पोस्ट करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. लग्नानंतर प्रथमेश व मुग्धा संसारात रमलेलेही दिसत आहेत. याशिवाय दोघांनीही कामालाही जोरदार सुरुवात केलेली पाहायला मिळत आहे. गायनाच्या कार्यक्रमांचे अपडेटही ते सोशल मीडियावरुन शेअर करत असतात.