सध्या सिनेसृष्टीत एकीकडे लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत असताना काही कलाकारांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनीही साऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर व निखिल पटेल यांच्या लग्नाबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. अभिनेत्रीने गेल्या वर्षी २०२३मध्ये निखिल पटेलशी लग्न केले. दलजीत व निखिल यांच्या संसाराला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांच्या नात्यात दुरावा आला असल्याचं समोर आलं आहे. (Actress Second Marriage In Trouble)
प्रसिद्ध अभिनेत्री दलजीत कौर हिने मार्च २०२३मध्ये निखिल पटेलसह मोठ्या थाटामाटात लग्न केले. मेहंदीपासून हळदीपर्यंत आणि त्यानंतर लग्नापर्यंत प्रत्येक क्षणाचा तिने आनंद लुटला. निखिल व दलजीतच्या लग्नाला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. आता लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे नुकत्याच समोर आलेल्या कृतीवरुन कळत आहे. अभिनेत्रीने तिच्या पतीचे सर्व फोटो सोशल मीडियावरुन डिलीट केले असल्याचं समोर आलं आहे. त्यात आणखी एक नवीन अपडेट आली आहे ज्यामध्ये काही नवीन दावे केले जात आहेत.
‘इटाईम्स टीव्ही’शी बोलताना दलजीत कौरच्या जवळच्या सूत्राने निखिल पटेलबरोबरच्या तिच्या लग्नाबद्दल भाष्य केले आहे. आणि त्यांच्या विभक्त होण्याचे कारण सांगितले. सूत्राने सांगितले की, सुरुवातीला या जोडप्यामध्ये सर्व काही ठीक होते परंतु हा आनंद अल्पकाळ टिकला. सूत्रानुसार, काही वेळातच निखिल आणि दलजीत यांच्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या. समस्या वाढल्या, ज्यामुळे दोघांनाही कळले की ते एकमेकांसाठी बनलेले नाहीत.
गेल्या दोन महिन्यांत परिस्थिती बिकट झाल्याचेही सूत्राने सांगितले. अशा अडचणी कायम राहिल्या तर दलजीत व निखिल लवकरच वेगळे होऊ शकतात. ते घटस्फोट घेऊ शकतात. अद्याप त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला असल्याचं समोर आलेलं नाही. मात्र अभिनेत्रीच्या या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.