अयोध्या येथील राम मंदिराचे उद्घाटन व रामलल्लाचा अभिषेक सोहळा काल (२२ जानेवारी) रोजी थाटामाटात संपन्न झाला. या मोठ्या सोहळ्यात देशातील अनेक दिग्गज मंडळी व कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. दरम्यान अभिनेत्री कंगना रनौत एक दिवस आधी अयोध्येला पोहोचली होती. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या या सोहळ्यातील सर्व अपडेट देत होती. अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याव्यतिरिक्त ती इतर धार्मिक विधींमध्ये देखील भाग घेताना दिसली आहे. (Kangana Ranaut Post)
कंगना रनौतने जगद्गुरू रामभद्राचार्य यांची भेट घेतली. याशिवाय त्यांनी प्रसिद्ध हनुमानगढ़ी मंदिराला भेट दिली आणि आजूबाजूचा परिसरही झाडून घेतला. कंगना रनौतने बागेश्वर धाम सरकार म्हणजेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचीही भेट घेतली. त्यांनाही राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले होते. कंगनाने त्यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर करत ‘लहान भाऊ’ असं म्हणत हा फोटो शेअर केला होता. त्यांनी सांगितले की, त्यांना पहिल्यांदाच त्यांच्या वयापेक्षा लहान गुरू मिळाला आहे.

कंगना रनौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे धीरेंद्र कृष्ण शास्त्रीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्याबरोबर इतर अनेक साधू पाहायला मिळाले. हा फोटो शेअर करत कंगनाने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी पहिल्यांदा माझ्या वयापेक्षा लहान गुरुजींना भेटले, ते माझ्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहेत, मला त्यांना लहान भावाप्रमाणे मिठी मारावीशी वाटली” असं ती म्हणाली.
कंगना रणौतने पुढे लिहिले आहे की, “पण नंतर मला आठवले की आपण वयाने गुरु होत नाही, कर्माने गुरु बनतो, गुरुजींचे चरण स्पर्श करुन आशीर्वाद घेतले. जय बजरंगबली” असं म्हटलं आहे.