सिनेजगतातील सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार म्हणजे ऑस्कर. अनेकजण या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाच्या ९६ व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्कर २०२४च्या नामांकनांची घोषणा आज २३ जानेवारी रोजी होणार आहे. यंदाच्या ऑस्करच्या नामांकनामध्ये ‘बार्बी’, ‘ओपेनहाइमर’ व ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ हे चित्रपट सर्वाधिक वर्चस्व गाजवण्याची शक्यता आहे.
ऑस्कर २०२४ ची नामांकनं कधी जाहीर होतील?
यंदाच्या ऑस्करक २०२४ची नामांकने आज म्हणजेच मंगळवार २३ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता लॉस एंजेलिसमधील अकादमीच्या सॅम्युअल गोल्डविन थिएटरमधून थेट प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा कार्यक्रम संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.
ऑस्कर २०२४ सोहळा कधी पार पडणार आहे?
यंदाचा हा ९६वा ऑस्कर २०२४ पुरस्कार सोहळा रविवार, १० मार्च रोजी होणार आहे. हा पुरस्कार सोहळा अमेरिकेत संध्याकाळी ७ वाजता (म्हणजेच भारतात सोमवारी सकाळी ५.३० च्या सुमारास) पार पडणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जिमी किमेल हा शो होस्ट करणार आहेत.
ऑस्कर २०२४ नामांकनं कुठे पाहता येतील?
ऑस्कर २०२४च्या नामांकन सोहळ्याचं थेट प्रसारण केलं जाणार आहे. Oscar.com, Oskar.org व अकादमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा नामांकन सोहळा पाहता येणार आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी ऑस्करच्या सोहळ्यात आरआरआर या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात नामांकन मिळालं होतं. याशिवाय भारताकडून पाठवलेल्या ‘ऑल दॅट ब्रीद्स’ला बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर फिल्म विभागात आणि ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ला बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म विभागात नामांकन मिळालं होतं.