Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’मध्ये सध्या जोरदार वाद सुरु असलेले पाहायला मिळत आहेत. स्पर्धकांमधील ही चुरशीची लढत अधिकच तीव्र होताना दिसत आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या १७व्या सिझनचा फिनालेही जवळ आलेला पाहायला मिळत आहे. टीम ए व टीम बी यांच्यात रंगलेल्या टास्कदरम्यान दोघांमध्ये चांगलीच लढत पाहायला मिळाली. टॉर्चर टास्कदरम्यान टीम ए ने टीम बी वर मात करत विजय पटकावला. यामुळे टीम ए म्हणजेच मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार व अरुण माशेट्टी हे स्पर्धक फिनालेमध्ये गेले.
तर दुसऱ्या टीममधील अंकिता लोखंडे, विकी जैन, इशा मालवीय व आयेशा खान यांचा पराभव झाला. टॉर्चर टास्कमध्ये मुन्नवरच्या टीमला अंकिताच्या टीमने खूप टॉर्चर केलं. लाल मिरची पावडर त्यावर पाण्याचा फवारा मारत स्पर्धकांना अक्षरशः घायाळ केलं. त्यावेळी जेव्हा काही वस्तू मुन्नवरने त्याच्या जॅकेटमध्ये लपवल्या तेव्हा दोन्ही टीममध्ये जोरदार वाद झाला. मुन्नवरने वस्तू जॅकेटमध्ये लपवल्यावर मनारा त्याचं संरक्षण करताना दिसली.
यावेळी अंकिता, विकी, आयेशा व इशाने मन्नारासाठी अपशब्द वापरले व घाणेरड्या भाषेत तिच्यावर टीका केली. अंकिता लोखंडे, विकी, आयेशा व इशाने मन्नाराला ज्याप्रमाणे टास्कमध्ये टॉर्चर केलं, तिच्यासाठी वाईट शब्द वापरले त्याबद्दल नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली. या एपिसोडनंतर सोशल मीडियावर अंकिता, विकी, इशा व आयेशाला खूप ट्रोल करण्यात आलं. दरम्यान अनेकांनी मन्नाराचं समर्थन केलं.

या टॉर्चर टास्कवर चाहत्यानांतर आता प्रियांका चोप्राच्या आईची प्रतिक्रियाही समोर आली आहे. मन्नाराच्या इन्स्टाग्रामवर या भांडणाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “सर्वांना लाज वाटली पाहिजे. आम्ही याला खेळ म्हणत नाही. आम्ही आता प्रत्येकाची खरी बाजू पाहत आहोत” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओवर मन्नाराची मामी व अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी कमेंट करत “देवा.यांचं वागणं किती रानटी आहे”, असं म्हणत भाचीला पाठिंबा दर्शविला आहे.